वैभववाडीतील सिंधुभूमी डेअरीत पॅकिंग, वितरण सुरु
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोकणवासियांना ताजे व सकस दूध मिळण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे सिंधुभूमी डेअरी फार्म नाधवडे, तालुका वैभववाडी येथे दूध पॅकिंग चालू केले आहे. माजी चेअरमन रणजीत पाटील, विश्वास पाटील यांच्या हस्ते रविवारी शुभारंभ झाला असून सोमवारपासून याचा वितरणही सुरु करण्यात आले.
कोकणातील नेमळे, फोंडा या भागातून संकलित होणारे दूध संघामार्फत बसविलेल्या बल्क मिल्क कुलरमध्ये साठविण्यात येते व टँकरद्वारे गोकुळ येथे आणले जाते त्यावर प्रक्रिया करून ते दूध पुन्हा रत्नागिरी, चिपळूण, कुडाळ, गोवा या ठिकाणी विक्रीसाठी पाठविले जाते.
संघाचा वाहतूक खर्च कमी व्हावा व कोकणवासीयांना दूध लवकरात लवकर उपलब्ध व्हावे, हा हेतू समोर ठेवून कोकण भागात संकलित होणाऱया दूधावर प्रक्रीया करुन कोकणातच पॅकींग करुन ग्राहकांना उपलब्ध करुन देण्याचा गोकुळने महत्वपूर्ण निर्णय घेतला. सध्या नेमळे, फोंडा या भागातून दररोज अंदाजे 22 हजार लिटर दूध संकलित होत असून, ते सिंधुभूमी डेअरी फार्म यांच्याकडे पॅकींग केले जाणार आहे. भविष्यात या भागातील दूध उत्पादकांचे हित डोळÎासमोर ठेवून दूध संकलनामध्ये वाढ करण्यासाठी संघाच्या सर्व सेवा-सुविधा,योजना दूध उत्पादकांना देण्यात येणार असून दूध संकलन व विक्री अंदाजे 1 लाख लिटर करण्याचा संघाचा मानस असल्याचे विश्वास पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी सिंधुभूमी डेअरी फार्मचे संस्थापक आमदार प्रमोद जठार, गोकुळचे संचालक बाळासो खाडे, उदय पाटील, विजय तथा बाबा देसाई, विलास कांबळे, जयश्री पाटील-चुयेकर, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी एस. एम. पाटील, डेअरी मॅनेजर ए. वाय. चौधरी, गुणनियंत्रण मॅनेजर सुरज समुद्रे, मार्केटिंग मॅनेजर हणमंत पाटील, शशिकांत पाटील, रामचंद्र भोगम, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.