चिपळूण / प्रतिनिधी
कोकणातील चिरेखाणीवर बंदी आणण्यात आली होती. मात्र गुरुवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत येत्या आठ दिवसात कोकणातील जांभा दगड चिरेखाण उत्खनाला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यासंदर्भात आमदार शेखर निकम यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. तटकरे यांनी आज गुरुवरी मुंबईत या संदर्भात बैठक आयोजित केली होती.खाण मंत्रालयाच्या दि. १० फेब्रुवारी २०१५च्या अध्यादेशानुसार गौणखनिज यामध्ये लॅटरराईट म्हणजे जांभा दगड याचा समावेश केला आहे. त्यानुसार शासनाच्या गौण खनिज विभागाकडून दि. ८ सप्टेंबर २०२० रोजी गौण खनिज संवर्धनाकरिता तात्पुरते परवाने मंजूर करण्यात येऊ नयेत, असे आदेश देण्यात आले होते.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांमध्ये जांभा दगड व्यवसायिक आहेत. जांभा दगडाचे उत्खनन प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय यांच्याकडून अल्पमुदतीचे परवाने घेऊन करण्यात येते. याचा उपयोग ग्रामीण भागात कमी खर्चात घरे बांधण्यासाठी होतो. अधिकाऱ्यांच्याही ही गोष्ट लक्षात आली. त्यामुळे हा निर्णय बदलण्याचे या बैठकीत ठरले. येत्या आठ दिवसात जांभा दगड चिरे खाणींना परवानगी दिली जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.या बैठकीला राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार शेखर निकम यांच्यासह या विभागाचे अधिकारी, या व्यवसायातील प्रतिनिधी उपस्थित होते.