चुकीची जीवनशैली कर्करोगास कारणीभूत
प्रतिनिधी/ चिपळूण
देशात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात कोकण पट्टय़ात पुरुषांमध्ये तोंड आणि जिभेचा तर स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग मोठय़ा प्रमाणात आढळून येत असल्याची माहिती येथील ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटरचे रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. गौरव जसवाल यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना दिली.
ते पुढे म्हणाले की, डब्ल्यूएचओच्या कर्करोगाच्या अहवालानुसार, भारतात पुरुषांमध्ये फुफ्फुस, तोंड, ओठ, घसा आणि मान अशा कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. महिलांमध्ये गर्भाशय, स्तन व गर्भाशय मुखाचा कर्करोग मोठय़ा प्रमाणात आढळतो. वृद्धांमध्ये, मूत्रपिंड, आतडय़ांसंबंधी आणि प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग अधिक प्रमाणात आढळून येतात. संशोधनात असे दिसून आले आहे की, विशिष्ट जोखीम घटकांमुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढू शकते. वय व कौटुंबिक इतिहासदेखील प्रमुख कारणांपैकीच आहेत. चुकीच्या जीवनशैलीमुळे स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. धूम्रपान, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव आणि असंतुलित आहार यासारखे घटक कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात.
वेळीच निदान होणे महत्त्वाचे
कर्करोगाचे वेळीच निदान व उपचार केल्यास भविष्यातील धोका टाळता येतो. या आजारासंबंधी जनजागृती होणे आवश्यक आहे. साक्षरतेचे प्रमाण अधिक असलेल्या केरळमध्ये 40 टक्के रुग्णांचे वेळीच निदान झाल्याने मृत्यू कमी झाला आहे. लवकर उपचार हा कर्करोगावरील एक उत्तम उपचार आहे, असे म्हणता येईल. आपल्या शरीराच्या कार्यक्षमतेबद्दल किंवा भावनांमध्ये मोठे बदल निदर्शनास आल्यास डॉक्टरांना भेटले पाहिजे. विशेषतः असा बदल तीन आठवडय़ांपेक्षा जास्त काळ टिकत असेल तर वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे
कर्करोग साथीचा रोग बनत चालला आहे
कर्करोग हळूहळू साथीचा रोग बनत चालला आहे. याला प्रतिबंध करण्यासाठी, लवकर निदानासाठी प्राथमिक लक्षणांकडे दुर्लक्ष न करणे तसेच नियमितपणे तपासणी करणे आवश्यक आहे. कुटुंबातील काही सदस्य किंवा पालक तपासणी करण्यास तयार नसतील तर स्वतः जबाबदारी घेणे, जनजागृती करणे आवश्यक आहे. स्तनांच्या कर्करोगावर उपचारासाठी विशेषतः 40 पेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांनी नियमित तपासणी करून घ्यावी. पॅप स्मियर तसेच मॅमोग्राफी चाचण्यांचा आधार घ्यावा. तंबाखूचे सेवन टाळणे हा आरोग्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयापैकी एक आणि कर्करोग प्रतिबंधाचा एक महत्वाचा भाग आहे.
भरपूर पाणी, द्रवपदार्थ सेवन लाभदायक
एचपीव्ही लसीमुळे कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) लस बहुतेक गर्भाशयाच्या ग्रीवेचा आणि इतर अनेक कर्करोग रोखू शकते. हेपेटायटीस बीची लस यकृत कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते. मुबलक पाणी व इतर पातळ पदार्थांचे सेवन केल्यास मूत्राशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो तसेच कर्करोगास कारणीभूत एजंट्सची एकाग्रता कमी करुन ते मूत्राशयातून द्रुतगतीने वाहण्यास मदत होते.
सेंद्रिय पदार्थ, अँटीऑक्सिडंट्सला प्राधान्य हवे
निरोगी आहार व नियमित व्यायाम हे कर्करोग प्रतिबंधासाठी महत्वपूर्ण पाऊल आहे. सेंद्रीय भाजीपाला, फळे यांचे सेवन व आहारात अँटीऑक्सिडंट्सवर समावेश गरजेचा असल्याचे डॉ. जसवाल यानी सांगितले.