गोव्याच्या धर्तीवर योजना प्रस्तावित
प्रतिनिधी/ रत्नागिरी
गोव्यातील किनाऱयाप्रमाणे कोकणातील किनारपट्टीवर देखील ‘शॅक्स’ उभारणीला परवानगी मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. गुरूवारी होणाऱया मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यास कोकणच्या पर्यटनाला नवी झळाळी प्राप्त होईल असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
सामंत यांनी मुंबईतून झुम ऍप मिटींगद्वारे बुधवारी रत्नागिरीतीलपत्रकारांशी संवाद साधला. पर्यटन क्षेत्राच्या विकासातून कोकणची अर्थव्यवस्था अधिक गतीमान करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून गोव्याच धर्तीवर कोकणाततही ‘बीच शॅक्स’ ला परवानगी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या अंतर्गत कोकणातील 720 किमी लांबीच्या किनाऱयावर गोव्याच्या धर्तीवर शॅक, सी-फूड आणि मद्यविक्रीलादेखील परवानगी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून कोकणातील युवकांना रोजगार निर्मितीही करणे शक्य होणार आहे. गुरूवारच्या मंत्रीमंडळ बैठकीत या प्रस्तावास मान्यता मिळाल्यास कोकण पर्यटनाला नवा साज चढेल असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.
रत्नागिरीच्या राजाचा उत्सव साधेपणाने
राज्य शासनाच्या नियमांच्या अधीन राहून यावर्षी श्री रत्नागिरीच्या राजाचा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. यंदा भव्य मुर्तीऐवजी 3 फूट उंचीची मूर्ती स्थानापन्न करण्यात येणार आहे. गणपती आगमन व निरोपाची मिरवणूक होणार नाही. तसेच भाविकांनी दर्शनासाठी रांगा न लावता ऑनलाईन दर्शन घ्यावे यासाठी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
दहीहंडी उत्सव रद्द
कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता यंदा मांडवी येथे होणारी दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला आहे. सोशल डिस्टस्टींगची अंमलबजावणी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
वाढीव भरपाईचा जीआर
निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना वाढीव नुकसान भरपाई देण्यासंदर्भात 17 जून रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाचा शासन आदेश बुधवारी जारी झाला आहे. त्याची त्वरीत अंमलबजावणी होणार आहे. ज्यांना जुन्या परिपत्रकाप्रमाणे नुकसान भरपाई मिळाली आहे, त्यांच्या खात्यात वाढीव नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाईल अशी माहिती सामंत यांनी यावेळी दिली.