प्रतिनिधी /फोंडा
कोकण मराठा सांस्कृतिक संघाच्या फोंडा शाखेचा 19वा वर्धापनदिन सोहळा वारखंडे फोंडा येथील हनुमान मंदिरच्या सभागृहात नुकताच साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कारवार येथील अंकोला मतदारसंघाच्या आमदार रुपाली नाईक उपस्थित होत्या. खास निमंत्रित म्हणून पोलीस उपअधीक्षक गुरुदास कदम, संघाचे अध्यक्ष किरण नाईक, सचिव मंजुनाथ कदम, महिला विभाग प्रमुख यशिता नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रुपाली नाईक म्हणाल्या, आपण नोकरी व्यवसायानिमित्त जगभर कुठेही वास करीत असलो तरी आपल्या मातीशी नाळ तुटता कामा नये. गोमंतक मराठा समाज हा प्रगतशील समाज असून या समाजातील बांधवांनी देश-विदेशात लौकिक मिळविला आहे. समाजासाठी त्यांचे योगदानही तेवढेच महत्त्वाचे आहे. कोरोना काळातून सावरताना आपण एका मोठय़ा संकटावर मात केली आहे. या संकटाने आपल्याला मानवतेचे धडे दिले, असे उद्गारही त्यांनी काढले.
गुरुदास कदम म्हणाले, आपण समाजाचे काही देणे लागतो, ही भावना मनाशी जपून प्रत्येकाने आपल्या उन्नती व प्रगतीचा मार्ग चोखाळावा. कोकण मराठा समाजाच्या फोंडा शाखेच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. स्वागत व प्रास्ताविक किरण नाईक यांनी केले. समाजासाठी सभागृह बांधण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला. मंजुनाथ कदम यांनी वार्षिक अहवाल सादर केला. एस. बी. नाईक व श्रीप्रसाद यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री कदम यांनी केले. महिला विभागातर्फे नाटय़छटा नृत्य व गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. वर्षभर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते पारितोषिके देण्यात आली.