प्रतिनिधी/ खेड
दक्षिण-पश्चिम रेल्वेने मडगावनजीक पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी 10 ऑक्टोबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे रविवारी कोकण मार्गावर धावणाऱया 8 गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. अन्य गाडय़ांच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार असल्याने प्रवाशांना विलंबाच्या प्रवासाला समोर जावे लागणार आहे.
दक्षिण रेल्वे मार्गावर मडगावनजीकच्या संवोर्देम-चांडोर-गोवा-मडगाव जंक्शन हा मार्ग दुपरीकरणाने जोडला जाणार आहे. या कामासाठी 10 ऑक्टोबरला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यासाठी तिरूपती-हैद्राबाद वास्को द गामा एक्सप्रेस, पुणे-एर्नाकुलम, एर्नाकुलम-पुणे, रत्नागिरी-मडगाव, मडगाव-रत्नागिरी, मंगळूर-मडगाव, मडगाव-मंगळूर या 8 रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई-मडगाव गाडी करमाळीपर्यंतच धावणार आहे. सीएसएमटी मुंबई-मडगाव गाडी सावंतवाडीरोड ते मडगावदरम्यान 2 तास थांबवण्यात येणार आहे. सावंतवाडीरोड-मडगाव गाडीला 45 मिनिटे थांबा देण्यात येणार आहे.
‘हिसार-कोईमतूर’ला एक अतिरिक्त डबा
कोकण मार्गावरून धावणाऱया हिसार-कोईमतूर साप्ताहिक विशेष गाडीला एक अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे. 13 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर या कालावधीत दर बुधवारी धावणारी ही स्पेशल आता 19 डब्यांची धावणार आहे.