प्रतिनिधी / खेड
कोकण रेल्वेवरील 5 गाडय़ा सोमवार 15 नोव्हेंबरपासून नियमित धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोरोना काळात या रेल्वे विशेष गाडय़ा म्हणून चालवल्या जात होत्या. कोरोना आटोक्यात येत असल्याने पूर्वीच्याच क्रमांकाने या गाडय़ा धावणार आहेत. तसेच त्यांचे तिकीट दरही कोरोनापूर्व काळानुसारच असतील, असेही कोकण रेल्वेने जाहीर केले आहे. यामध्ये कोकणकन्या एक्स्प्रेस ही गाडी कोरोनाच्या काळात विशेष गाडी म्हणून 01111/01112 या क्रमांकाने धावत होती. आता ती 10111/10112 या पूर्वीच्याच क्रमांकाने धावणार आहे. मांडवी एक्स्प्रेस 10103/10104, रत्नागिरी-मडगाव 10101/10102, दिवा-सावंतवाडी 10105/10106) या दररोज तर मडगाव-मंगळूर (10107/10108) या रविवारशिवाय इतर 6 दिवशी धावणाऱया गाडीचा त्यामध्ये समावेश आहे. या गाडय़ा नियमित गाडय़ा म्हणून धावणार आहेत, असे कोकण रेल्वेने जाहीर केले आहे. दिवा-सावंतवाडी आणि सावंतवाडी-दिवा, रत्नागिरी-मडगाव आणि मडगाव-रत्नागिरी तसेच मडगाव-मंगळूर व मंगळूर-मडगाव या गाडय़ा पॅसेंजर गाडय़ा असल्या तरी त्यांना तूर्तास एक्स्प्रेस गाडय़ा असेच संबोधण्यात येणार आहे.