मंगळूर – लोकमान्य टिळक, दादर – तिरुनेलवेली धावणार, प्रवाशांना दिलासा
प्रतिनिधी / खेड
कोकण मार्गावर सुपरफास्ट महोत्सव गाड्यांची खैरात सुरूच असल्याने प्रवाशी कमालीचे सुखावले आहेत. दक्षिण रेल्वेच्या सहकार्याने आणखी दोन नियमित सुपरफास्ट महोत्सव विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मंगळूर लोकमान्य टिळक १७ डिसेंबरपासून तर दादर तिरुनेलवेली साप्ताहिक गाडी १६ पासून कोकण मार्गावर धावणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
मंगळूर लोकमान्य लोकमान्य टिळक सुपरफास्ट महोत्सव नियमित ३१ डिसेंबरपर्यंत धावणार आहे. ही गाडी मंगळूर येथून दुपारी २.४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी ३.२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता मंगळूरला पोहचेल. २० डब्यांच्या या गाडीला कोकण मार्गावर कुडाळ, रत्नागिरी, चिपळूण, पनवेल आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
तिरुनेलवेली – दादर साप्ताहिक गाडी बुधवारी १६, २३, ३० डिसेंबर याकालावधीत धावणार आहे. ही गाडी तिरुनेलवेली येथून सकाळी ७.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजता दादरला पोहचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी गुरूवारी १७, २४, ३१ डिसेंबर याकालावधीत धावेल. दादर येथून रात्री ८.४० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता तिरुनेलवेलीला पोहचेल.१५ डब्यांच्या या गाडीला कोकण मार्गावर पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.