प्रतिनिधी/ खेड
कोरोना हळूहळू नियंत्रणात येत असल्याने रेल्वे प्रशासनाने एकामागोमाग एक कोकण मार्गावर रेल्वेगाडय़ा चालवण्यास प्रारंभ केला आहे. त्यानुसार 23 ऑक्टोबरपासून कोकण मार्गावर नागपूर-मडगाव व पुणे-मडगाव साप्ताहिक फेस्टिवल स्पेशल रेल्वेगाडय़ा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन रेल्वेगाडय़ांमुळे मुंबई व पुणेस्थित चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.
दसऱयाच्या पार्श्वभूमीवर 21पासून वास्को-द-गामा ते पाटणा ही साप्ताहिक सुपरफास्ट फेस्टिवल स्पेशल रेल्वेगाडी धावणार आहे. 21 डब्यांच्या या गाडीला पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. यापाठोपाठ 23 व 30 ऑक्टोबर, 6 नोव्हेंबर या कालावधीत नागपूर-मडगाव साप्ताहिक फेस्टिवल स्पेशल गाडी धावणार आहे.
ही गाडी नागपूर येथून सायंकाळी 4 वाजता सुटून दुसऱया दिवशी सायंकाळी 4 वाजून 40 मिनिटांनी मडगावला पोहचेल. परतीच्या प्रवासात मडगाव येथून सायंकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी सुटून दुसऱया दिवशी रात्री 8.30 वाजता नागपूरला पोहचेल. या गाडीला कोकण मार्गावर पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
पुणे-मडगाव फेस्टिवल स्पेशल 23, 30 ऑक्टोबर व 6 नोव्हेंबर यादरम्यान धावणार आहे. पुणे येथून सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी सुटून दुसऱया दिवशी सकाळी 8.30 वाजता मडगावला पोहचेल. परतीच्या प्रवासात मडगाव येथून सायंकाळी 4 वाजता सुटून दुसऱया दिवशी सकाळी 5.50 वाजता पुणे येथे पोहचेल. 22 डब्यांच्या या गाडीला लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आदीठिकाणी थांबे देण्यात आले आहेत.