प्रतिनिधी/ खेड
कोकण मार्गावरुन धावणाऱया रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक गेल्या दोन दिवसांपासून पुरते बिघडले असून सोमवारीही हीच परिस्थिती कायम राहिल्याने प्रवाशांना पुन्हा मनस्तापाला सामोरे जावे लागले.
मुंबईहून मडगावला जाणारी मांडवी एक्स्प्रेस चार तास तर मडगावहून मुंबईला जाणारी मांडवी एक्स्प्रेस दीड तास विलंबाने धावली. मुंबईला जाणारी कोकणकन्या एक्स्प्रेसही 2 तास उशिराने धावली. या रेल्वेगाडय़ांच्या बिघडलेल्या वेळापत्रकाचा अन्य रेल्वेगाडय़ांवरही परिणाम झाला होता. यामुळे प्रवाशांना तासन्तास स्थानकातच तिष्ठत बसावे लागले.
रविवारीही मांडवीसह नेत्रावती एक्स्प्रेस, ओखा एक्स्प्रेस व मत्स्यगंधा एक्स्प्रेस एक तास उशिरानेच धावल्या. सुटीच्याच दिवशी प्रवाशांना रखडपट्टीला सामोरे जावे लागल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक बिघडण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.