प्रतिनिधी/ खेड
कोकण रेल्वे मार्गावर उक्षी बोगद्यानजीक राजधानी एक्स्प्रेसला घडलेल्या अपघातानंतर विस्कळीत झालेले वेळापत्रक दुसऱया दिवशीही तसेच कायमच राहिल्याने प्रवाशांना विलंबाच्या प्रवासाला समोर जावे लागले. रविवारी मुंबईकडे जाणारी नेत्रावती एक्स्प्रेस अडीच तास तर मुंबईहून मडगावकडे जाणारी मांडवी एक्स्प्रेस तब्बल 4 तास 20 मिनिटे उशिरानेच धावत होती.
विस्कळीत वेळापत्रकाचा दुसऱया दिवशीही प्रवाशांना फटका बसला. प्रवाशांना तासन्तास रेल्वेस्थानकातच तिष्ठत बसावे लागल्याने मनस्ताप सहन करावा लागला. कोकण रेल्वेचे विस्कळीत वेळापत्रक पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाचे कसोशीचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आले.
तेजस, दुरांतो एक्स्प्रेसही 10 जुलैपासून रुळावर
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोकण मार्गावरून धावणाऱया छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-करमाळी तेजस एक्सप्रेस व लोकमान्य टिळक टर्मिनस-एर्नाकुलम दुरांतो एक्स्प्रेस या 2 गाडय़ांना ब्रेक लावण्यात आला होता. या दोन्ही एक्स्प्रेस पुन्हा चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून त्यानुसार 10 जुलैपासून या दोन्ही गाडय़ा कोकण मार्गावर धावणार आहेत.
कोकण मार्गावरुन धावणाऱया दोन्ही एक्स्प्रेसना प्रवाशांची सर्वाधिक पसंती मिळत होती. मात्र, कोरोनाचा फैलाव वाढल्यानंतर 1 मे पासून दोन्ही एक्स्प्रेस बंद करण्यात आल्या होत्या. या दोन्ही एक्स्प्रेसच्या सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 10 जुलैपासून तेजस एक्स्प्रेस दर बुधवारी, शुक्रवारी, रविवारी तर परतीच्या प्रवासात दर मंगळवारी, गुरुवारी व शनिवारी धावेल. लोकमान्य टिळक टर्मिनस-एर्नाकुलम दुरांतो स्पेशल दर मंगळवारी व शनिवारी धावेल. परतीच्या प्रवासात दर बुधवारी व रविवारी धावेल. या दोन्ही एक्स्प्रेस कोकण मार्गावर पुन्हा धावणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.