18 तासांत बोगदा पुन्हा खुला
प्रतिनिधी /मडगाव
ओल्ड गोवा बोगदय़ात रूळावर सोमवारी पहाटे 4.40 वा. पाणी व चिखल पडल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे काही रेलगाडय़ा अन्य मार्गाने वळविण्यात आल्या होत्या. मात्र, कोकण रेल्वेच्या कर्मचाऱयांनी शर्थीचे प्रयत्न करून रात्री 10.30 वाजे पर्यंत रेल्वे रूळावरील चिखल हटविण्यात आला तसेच बोगदय़ाला लागलेली गळती रोखण्यात यश मिळविले व त्यानंतर पुन्हा या बोगदय़ातून रेलगाडय़ा धावू लागल्या.
सोमवारी पहाटे जेव्हा वॉचमनने ओल्ड गोवा बोगदय़ाला गळती लागून रेल्वे रूळावर चिखल व पाणी पडू लागल्याची कल्पना त्वरित आपल्या वरिष्ठांना दिली व रेल्वे वाहतूक रोखण्यात आली. त्यामुळे मडगाव, करमळी व थिवी रेल्वे स्थानकावर रेलगाडय़ा थांबवून ठेवण्यात आल्या. काही रेलगाडय़ा थांबविण्यात आलेल्या ठिकाणाहून परतीच्या मार्गावर पाठविण्यात आल्या तर काही रेलगाडय़ा अन्य मार्गाने वळविण्यात आल्या.
रेल्वे रूळावर सातत्याने चिखल व पाणी पडत असल्याने समस्या निर्माण झाली होती. कोकण रेल्वेच्या कर्मचाऱयांनी युद्धपातळीवर दुरूस्तीचे काम हाती घेतले होते. त्यात सुमारे 100 मजुर गुंतले होते अशी माहिती कोकण रेल्वेच्या सूत्रांनी दिली. बोगदय़ाला लागलेली गळती देखील रोखण्यात मोठे यश मिळविले होते. त्यानंतर बोगदा सुरक्षित असल्याची चाचणी घेतल्यानंतर रेलगाडय़ा सोडण्यात आल्या व त्यात मत्स्यगंधाही धावली. बोगदय़ात अद्याप थोडे काम शिल्लक राहिले असून दोन गाडय़ाच्या मध्ये जो वेळ मिळतोय, त्यावेळेत हे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती बबन घाटगे यांनी दिली.