प्रतिनिधी/ खेड
कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम गतीने सुरू आहे. या कामाचा ठेका एल ऍण्ड टी कंपनीला देण्यात आला आहे. या कंपनीचे युटीबीचे मशिन रूळावरून घसरल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास करंजाडीनजीक घडली. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून रेल्वे वाहतुकीवर कुठल्याही प्रकारचा परिणाम झाला नसल्याचे सांगण्यात आले.
विद्युतीकरणाच्या कामासाठी कंपनीचे युटीबी मशिन घेऊन जात असताना अचानक करंजाडीनजीक रूळावरून हे मशिन घसरल्याने खळबळ उडाली. या घटनेत मशिनचे नुकसान झाले आहे. मात्र यात कुणालाही दुखापत झालेली नाही वा रेल्वेच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. या प्रकरणी रेल्वे प्रशासनाकडून कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.