कोकरूड / वार्ताहर
कोकरूड, ता.शिराळा येथील परिसरात तरसाने केलेल्या हल्ल्यात एक शेळी व एक बोकड ठार झाले तर शेजारी छपरात बांधलेल्या दोन म्हैशींना जखमी केले आहे. यामध्ये विद्या विलास मोहिते या शेतकरी महिलेचे अंदाजे २५ हजारांचे नुकसान झाले आहे.
कोकरूड येथे विद्या मोहिते यांचे घर असून त्या शेळीपालन व्यवसाय करत आहेत. शुक्रवारी, दि. १८ रोजी पहाटेच्या सुमारास परिसरातील उसाच्या फडातून आलेल्या तरसाने घराच्या पाठीमागे छपरात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला केला. यामध्ये एक शेळी व एक बोकड ठार झाले. यामध्ये विद्या मोहिते यांचे सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले आहे. ही घटना सकाळी निदर्शनास आली.
याबाबत ग्रामपंचायत सदस्य तानाजी घोडे यांनी वन विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनास्थळी वन कर्मचारी अधिक शेटके शिवाजी सावंत व शिवाजी पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला .