तब्बल दोन तासानंतर आग आटोक्यात
कागल / प्रतिनिधी
कोगनोळीजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील इंग्लिश मीडियम स्कूल शेजारी गुजरातहून म्हैसूरकडे नायलॉनच्या धाग्याचे 6 रोल घेऊन जात असलेल्या ट्रकला दूधगंगा नदीच्या दरम्यान आग लागली. ही आग आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने इंग्लिश मीडियम स्कूल जवळ असलेल्या सर्विसिंग सेंटर ची मदत घेतली. परंतु त्यामुळे आग आटोक्यात आलीच नाही. ही आग आटोक्यात आणण्यासाठी कागल नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर तब्बल दोन तासांनंतर सदरची आग आटोक्यात आली. दरम्यान कोगनोळीपासून सुमारे दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीची कोंडी बराच वेळ झाल्याचे दिसून आले. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गुजरातहून म्हैसूरकडे ट्रक जात होता. यावेळी अचानकपणे नायलॉनच्या धाग्यांना आग लागली. ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न होत होता. ट्रक मधील सर्व साहित्य जळून अखेर खाक झाले. शिवाय ट्रकचा टायर ही जळाला. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान या गाडीतील मालांचे झालेले दिसून येत होते. ट्रकचे मालक असिफ पटेल हे स्वतः ट्रक चालकहून मालक होते. त्यावेळी त्यांची अवस्था दयनिय झाल्याचे दिसून आले.
यावेळी बर्निंग ट्रकचा थरार पाहण्यासाठी कोगनोळी, कुन्नूर, वंदूर, शेंडूर, राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणारे प्रवासी यांनी तोबा गर्दी केल्याचे दिसून आले.