गेल्या महिन्यात बजावली होतीसेवा: प्रशासकीयपातळीवर खळबळ
प्रतिनिधी/ निपाणी
कर्नाटकात कोरोना रुग्ण गतीने वाढत आहेत. यातच कोरोनाला अटकाव घालण्यासाठी आरोग्य, पोलीस तसेच शासनाच्या विविध खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱयांनाही कोरोनाने ग्रासले आहे. कोगनोळी टोलनाक्यावर सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात असलेल्या चार पोलीस कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
या चार पोलिसांमध्ये तिघेजण सशस्त्रदल तर एकजण राज्य राखीव पोलीस दलातील आहे. 24 मार्चपासून देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला. यानंतर कर्नाटकातही अन्य राज्यातून नागरिकांचा होणारा प्रवेश व कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोगनोळी टोलनाका येथे आंतरराज्य सीमेवर पोलिसांसह प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. येथे परराज्यातून येणाऱया प्रवाशांची पूर्ण चौकशी करून त्यांना क्वारंटाईन केले जात आहे.
कोगनोळी टोलनाक्यावर विविध जिल्हय़ातील पोलीस तैनात आहेत. मात्र यापैकी मंडय़ा जिल्हय़ातील 7 ते 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली होती. यानंतर आता पुन्हा चार पोलीस कोरोनाबाधित झाल्याने चिंता वाढली आहे. या चारपैकी तिघेजण गेल्या महिन्यात कोगनोळी नाक्यावर सेवा बजावून 30 जून रोजी आपल्या गावी परतले होते. तर एकजण दहा दिवसांपूर्वी परतला होता. यानंतर 1 जुलै रोजी त्यांचा स्वॅब घेण्यात आला. त्याचा अहवाल शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास आला. त्यानुसार सदर चौघे जण कोरोनाबाधित झाल्याचे स्पष्ट झाले. चार पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजताच सतर्क झालेल्या पोलीस प्रशासनाने या चार जणांच्या प्राथमिक संपर्कात आलेल्या सहाय्यक उपनिरीक्षकासह 8 जणांना कोगनोळीनजीकच्या एका लॉजमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.
चौकट
अनेकजण संपर्कात आल्याची शक्यता
कोगनोळी नाक्यावर सेवा बजावलेल्या या चार पोलीस कर्मचाऱयांच्या संपर्कात अनेकजण आल्याची शक्यता आहे. येथे पोलीस, आरोग्य खाते, महसूल, शिक्षण तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारीही कार्यरत आहेत. तसेच या नाक्यावरुन तपासणी करून घेत कर्नाटकात प्रवेश केलेले अनेक प्रवासीही या पोलिसांच्या संपर्कात आले असतील, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
सामाजिक अंतर राखा
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाच्या विविध खात्यातील कर्मचाऱयांसह पोलीस रात्रंदिवस कार्यरत आहेत. असे असताना अनेक ठिकाणी पोलीस कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र याबाबत कोरोना योद्धय़ांनी न घाबरता आपली सेवा सुरूच ठेवावी. नागरिकांनी कोरोना योद्धेच संकटात आहेत हे ओळखून आता तरी सामाजिक अंतर राखत लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन सीपीआय संतोष सत्यनायक यांनी केले आहे.
निपाणीतील अधिकाऱयांचे स्वॅब घेणार
दरम्यान कोरोनाबाधित आढळलेल्या या चार पोलीस कर्मचाऱयांच्या संपर्कात निपाणीतील पोलीस अधिकारीही आले होते. त्यामुळे सदर पोलीस अधिकारी व त्यांचे चालक यांचेही स्वॅब रविवारी घेण्यात येणार असल्याचे समजते.