प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक ‘कोजिमाशी’ पतसंस्था कर्जमर्यादा 35 लाख रुपये तर व्याजाचा दर 10 टक्के केला जाणार आहे. भागभांडवल मर्यादा 30 हजारावरून 35 हजार रुपये करणार. 24 टक्के दराने विक्रमी लाभांश देणार. वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न असणाऱया कनिष्ठ महाविद्यालयीन कर्मचाऱयांना सभासदत्व देणार. तसेच सभासदांचा 10 लाख रुपयांचा अपघाती विमा स्वखर्चाने उतरणार आहे, यासह अन्य निर्णय कोजिमाशि पतसंस्थेच्या 51 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आले. परंतू विरोधकांनी ऑनलाईन सभेवर मूक बहिष्कार टाकला.
कोजिमाशिची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी शाहूपुरी येथील संस्थेच्या प्रधान कार्यालयात व्ही.सी.द्वारे पार पडली. शिक्षकनेते व तज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी स्वागत केले, संचालकांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली. चेअरमन बाळ डेळेकर अध्यक्षस्थानी होते. सभेत दिवंगत सभासदांना श्रध्दांजली वहाण्यात आली.
मार्च 2021 मध्ये संस्थेला 4 कोटी 22 लाख 72 हजार 580 रुपये नफा झाला. सभासदांना 24 टक्के लाभांश दिला जाणार आहे. संस्थेच्या ठेवी 466 कोटी 39 लाख 53 हजार रुपये असून, गुंतवणूक 162 कोटी 69 लाख 83 हजार रुपये तर भागभांडवल 19 कोटी 40 लाख 69 हजार इतके आहे. अशी माहिती आढावा घेताना चेअरमन बाळ डेळेकर यांनी दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद पाटील यांनी अहवाल वाचन केले. सर्व शाखांमध्ये सिसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. सभासदांच्या मुलींसाठी शहरात वसतिगृह सुरु करावे. दिपावली भेट म्हणून 15 किलो तेलाचा डबा द्यावा. वैद्यकिय उपचार कर्ज योजना सुरू करावी. मंगळवार पेठ शाखा इमारतीचे नुतनीकरण करावे. जुन्या पेन्शन योजनेसह शैक्षणिक समस्यांवर विचारविनिमय व्हावा, या उद्देश्याने सातही शिक्षक आमदारांना कोल्हापूरात बोलावून गोलमेज परिषदेचे आयोजन करावे, अशा सूचना मांडण्यात याव्या. ऑनलाईन सभेत संजय परीट, सूर्यकांत चव्हाण, निशिकांत चव्हाण ,सुधाकर डोणोलीकर ,रमजान मुल्ला, अशोक मानकर, सचिन पाटील ,नामदेव घोलपे ,एस .पी .पाटील ,विनोद उत्तेकर ,दत्ता जाधव, आदी सभासदांनी सहभाग घेतला. व्हाईस चेअरमन सुभाष पाटील यांनी आभार मानले .
आठ टक्के व्याजदर केल्यास प्रगती थांबेल
कर्जाचा व्याजदर 8 टक्के करण्याची मागणी विरोधक करीत आहेत. मात्र ते ज्या संस्थेचे नेतृत्व करतात त्या संस्थेचा व्याजदर बारा टक्के आहे. कोजिमाशिने 8 टक्के व्याजदर केला तर संस्थेच्या आर्थिक प्रगतीला खीळ बसेल.
सभासदांसाठी विविध सुविधा
सन 20-21 च्या अहवालात संस्थेच्या मयत सभासदांचे 2 कोटी 80 लाख, 23 हजार 447 रूपये कर्जमुक्ती निधितून माफ केले आहे. कन्या योजनेअंतर्गत 93 सभासदांना 2 लाख 32 हजार रूपयांचे वाटप केले आहे. कोरोनात 285 सभासदांना 14 लाख 25 हजार रुपयांची मदत करण्यात आली. पुरग्रस्त शाळा व सभासदांना 13 लाख 2 हजार रुपये दिले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडे 2 लाख 50 हजार रूपये देवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. संसर्गग्रस्त सभासद व पुरगस्त शाळांना आर्थिक मदत केली.
विरोधकांचा कोजीमाशीच्या सभेवर मूक बहिष्कार
गतवर्षीच्या वार्षिक ऑनलाईन सभेत माईक म्यूट करण्यात आला होता. सभासदांच्या स्वातंत्र्यावर गदा आणून आवाज दाबला होता. त्यामुळे विरोधकांनी दिलेल्या वेळेत संस्थेने ऑनलाईन सभेतील तांत्रिक अडचणी दूर न केल्याने, कोजिमाशिच्या वार्षिक सभेत विरोधकांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला. परंतू मूक बहिष्कार टाकल्याने कोणतेच प्रश्न विचारले नव्हते.