एकेकाळी सर्व सुखे पायाशी लोळण घेत असल्याची अवस्था उपभोगलेल्या गुरुबक्ष राय यांची सध्याची स्थिती हृदयाला चरे पाडणारी आहे. गुरुबक्ष राय हे लंडनमध्ये राहतात. कुणाच्या अंतःकरणाला पाझर फुटेल, अशी त्यांची कहाणी आहे. लंडन येथे ते सध्या विकलांग अवस्थेत असून रस्त्यावर राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. वास्तविक त्यांच्या नावावर भारतातील बँकांमध्ये कोटय़वधी रुपये जमा आहेत. पण त्यातील एक रुपयाही त्यांना पाठवता येत नाही, अशी स्थिती आहे. कारण ही रक्कम कायद्याच्या कचाटय़ात सापडली आहे. त्यांनी न्यायालयाकडे आपल्या खात्यातील काही रक्कम लंडन येथे हस्तांतरित करावी, असा विनंतीअर्ज न्यायालयाकडे केला होता. तथापि, या अर्जाला आक्षेप घेण्यात आल्याने अद्याप त्याच्यावर निर्णय होऊ शकलेला नाही. त्यांची एक मुलगी भारतातच राहते. तिच्या माध्यमातून त्यांनी दिल्लीत न्यायालयात अर्ज केला आहे. तथापि, कार्यकक्षेचा मुद्दा उपस्थित करत न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. आता त्यांनी अन्य न्यायालयात तेच प्रयत्न सुरू केले आहेत. या नव्या न्यायालयाने त्यांच्या अर्जाची दखल घेतली आहे. पण बँकेकडून माहिती आल्याखेरीज आदेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या मुलीला आता बँकेच्या पायऱया झिजविण्याची वेळ आली आहे. गुरुबक्ष राय यांनी स्टेट बँकेच्या खात्यात अनेक वर्षांपूर्वी दीड कोटी रुपये जमा केले. 2019 मध्ये त्यांची लंडन येथे प्रकृती बिघडली. त्यांना ब्रिटनच्या किंग्जस्टन रुग्णालयात काही काळ ठेवण्यात आले. पण आता बिल न भरल्याने रुग्णालयाने अधिक काळ उपचार करण्यास नकार दिला. जवळ पैसा नसल्याने त्यांनी ब्रिटिश सरकारकडे मदतीची याचना केली. ती अल्प प्रमाणात मिळाल्याने काही दिवस भागले, पण आता त्यांच्यासमोर जीवन-मरणाचा प्रश्न उभा आहे. न्यायालयाचा निर्णय केव्हा होणार आणि आपल्याला पैसे कधी मिळणार? आणि ही सर्व प्रक्रिया आपण जिवंत असेपर्यंत पूर्ण होईल का? या प्रश्नांनी त्यांना पछाडले असून त्याचे उत्तर त्यांच्याही हातात नाही, अशी स्थिती आहे.
Previous Articleप्राणिक हीलिंग ही एक आरोग्य संजीवनीच
Next Article जडेजा म्हणतो, धोनीच्या भेटीची नेहमीच उत्सुकता
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.