जपानी राजकन्या माकोचा सर्वसामान्य नागरिकासोबत विवाह
वृत्तसंस्था / टोकियो
जपानची राजकन्या माको प्रदीर्घ वादानंतर अखेरीस स्वतःचा प्रियकर केइ कोमुरो याच्यासोबत विवाहबंधनात अडकली आहे. जपानी राजकन्येने एका सर्वसामान्य नागरिकासोबत विवाह केल्याने स्वतःचा राजघराण्याच्या सदस्याचा दर्जाही गमावला आहे. पण राजकन्येच विवाह आणि राजघराण्याच्या सदस्याचा दर्जा संपविण्याच्या मुद्दय़ावर जनतेचे मत विभागलेले आहे. माको आणि त्यांचा प्रियकर केई कोमुरो याच्या विवाहाचे दस्तऐवज मंगळवारी सकाळी महालाच्या एका अधिकाऱयाने सादरीकरण केले.
राजमहालाच्या सूत्रानुसार माको चालू महिन्याच्या प्रारंभी तणावाला तोंड देत होत्या, पण आता त्या त्यातून बाहेर पडत आहेत. स्वतःच्या विवाहाविषयी नकारात्मक बातम्या, विशेषकरून कोमुरो यांना लक्ष्य करण्यात आल्याने माको तणावाखाली होत्या. विवाहानंतर कुठल्याही प्रकारच्या विशेष भोजनाचे आयोजन होणार नाही तसेच कुठलेच विधी होणार नसल्याचे सांगण्यात आले.
माको (30 वर्षे) या सम्राट नारुहितो यांच्या पुतणी आहेत. त्या आणि कोमुरो टोकियोच्या ‘इंटरनॅशनल ख्रिस्तियन युनिव्हर्सिटी’मध्ये एकत्र शिकायचे. त्यांनी सप्टेंबर 2017 मध्ये विवाहाची घोषणा केली होती. पण त्यानंतर दोन महिन्यांनी कोमुरोच्या आईशी संबंधित एक वित्तीय वाद समोर आल्यावर विवाह टाळला गेला होता.
जपानच्या राजघराण्याच्या नियमानुसार सर्वसामान्य नागरिकासोबत विवाह केल्यावर माको यांनी यांनी स्वतःचा विशेष दर्जा गमावला आहे. त्यांनी स्वतःच्या पतीचे आडनाव स्वीकारले आहे. माको यांनी 14 कोटी येन (12.3 लाख डॉलर्स) स्वीकारण्यास नकार दिला आहे. सर्वसामान्य नागरिकाशी विवाह करताना भेटवस्तून कुठलीच रक्कम न स्वीकारणाऱया त्या राजघराण्याच्या पहिल्याच सदस्य आहेत.
उत्तराधिकाऱयांची कमतरता
मंगळवारी सकाळी माको या वधूच्या पोशाखात आणि हातात पुष्पगुच्छ घेत महालातून बाहेर पडल्या. आईवडिल युवराज अकिशिनो, युवराज्ञी किको आणि स्वतःची बहिण काको यांना त्या भेटल्या. राजघराण्याच्या महिला सदस्याने सर्वसामान्य नागरिकाशी विवाह केल्यावर त्याला शाही दर्जा गमवावा लागतो. या प्रथेमुळे राजघराण्याचे सदस्य कमी होत चालले आहेत. नारुहितो यांच्यानंतर उत्तराधिकाऱयाच्या शर्यतीत केवळ अकिशिनो आणि त्यांचे पुत्र राजपुत्र हिसाहिटो आहेत.