शॅडो कौन्सिलची टीका : ‘मॉडेल मडगाव’चे आश्वासन पूर्ण करण्यात पालिका मंडळाला अपयश
प्रतिनिधी/ मडगाव
कार्यकाळ संपलेल्या मडगाव पालिका मंडळाने 5 वर्षांत शहरासाठी काहीही केले नाही. मॉडेल मडगावचे आश्वासन पूर्ण करण्यात मंडळाला यश आले नाही. स्वच्छता शुल्क गोळा करून कोटय़वधी रुपयांची संसाधने घेतली गेली, तरी मडगावची कचरा समस्या तशीच आहे, अशी टीका शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.
पालिकेने वेगवेगळय़ा कचरा संकलन यंत्रणा सुरू केल्यास आता एक वर्ष झाले आहे. तथापि ओल्या कचऱयातून किमान एक किलो खत तयार करणे शक्मय झालेले नाही तसेच सुक्या कचऱयाचे बेलिंग प्रभावीपणे होत नाही, याकडे त्यांनी लक्ष वधले आहे. घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने बेलिंगसाठी पुरविलेली यंत्रे पावसाळय़ात भिजत ठेवली होती आणि आता ती काम करत नसून खराब झाली आहेत. जर नोंदी पाहिल्या, तर पालिका संचालकांकडून 2019 मध्ये बेलिंग यंत्रे ठेवण्यासाठी शेडच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली होती. पण शेडसाठीच्या निविदांना जाणीवपूर्वक उशीर करण्यात आला. या विलंबाचे मुख्य कारण नगरसेवकांना निविदा यादीमध्ये बनावट कामे समाविष्ट करण्यास मदत करण्याचे होते, असा आरोप कुतिन्हो यांनी केला आहे.
लोकायुक्तांनी घोटाळा झालेल्या निविदांबाबत स्वतःहून दखल घेतली असता बेलिंग यंत्रे ठेवण्यासाठी शेड बांधण्याच्या कामांना निकड म्हणून विचारात घेऊन मंजुरी देण्यात आली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. यंदा जूनमध्ये कामाचे आदेश दिल्यानंतरही कामे त्वरित सुरू केली गेली नाहीत आणि पावसात यंत्रे खुली ठेवण्यात आली याबद्दल कुतिन्हो यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या गुन्हेगारी स्वरूपाच्या दुर्लक्षाबद्दल संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. यामुळे 20 लाख किमतीच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
सोनसडा, एसजीपीडीए मार्केट आणि जुने मासळी मार्केट येथील परिस्थिती दयनीय आहे आणि लोकांच्या आरोग्यासाठी तो नवीन धोका बनला आहे. शॅडो कौन्सिल फॉर मडगाव केवळ टीका करते असे नाही. वेळोवेळी आम्ही केवळ सूचनाच दिलेल्या नाहीत, तर समस्या सोडविण्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. परंतु कोणत्या कारणांमुळे संबंधित अधिकारी नागरिकांना भाग घेऊ देण्यास तयार नसतात ते त्यांनाच ठाऊक, असे कुतिन्हो यांनी म्हटले आहे.