ऑनलाईन टीम / तिरुअनंतपुरम :
केरळमधील एका महिलेचा सलग 19 वेळा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे या महिलेला अजूनपर्यंत कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. मागील 42 दिवसांपासून तिच्यावर केरळमधील एका जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
केरळमधील जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राला माहिती दिली आहे. त्यानुसार, इटलीवरून आलेल्या एका कुटुंबाच्या संपर्कात आल्यामुळे या महिलेला कोरोनाची लागण झाली. 10 मार्चला ही महिला रुग्णालयात दाखल झाली. मागील 42 दिवस तिच्यावर वेगवेगळ्या औषधांचे उपचार करण्यात आले. मात्र, सलग 19 वेळा या महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे रुग्णालयात दाखल झाल्यापासून तिला कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. आता आणखी एकदा तिची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास तिला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.