आयएमए बेळगावचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती : हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी ओपीडी सेवा बंद
प्रतिनिधी / बेळगाव
रुग्णाची गंभीर अवस्था लक्षात घेऊन त्याचा जीव वाचविण्यासाठी सर्व ते प्रयत्न करूनही एका विशिष्ट संघटनेने डॉक्टरांना धक्काबुक्की करून हॉस्पिटलमध्ये घुसून गेंधळ माजविण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा आयएमए निषेध करत असून यापुढे कोणत्याही प्रकारचे हल्ले, धक्काबुक्की किंवा मारहाण डॉक्टर खपवून घेणार नाहीत, अशी माहिती आयएमए बेळगावचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बेळगावचे प्रसिद्ध डॉ. रोहित जोशी यांनी दि. 21 रोजी एका रुग्णावर शस्त्रक्रिया केली. परंतु रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याच्या कारणास्तव एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी डॉ. रोहित जोशी यांच्या हॉस्पिटलमध्ये घुसून गोंधळ माजविला व त्यांना धक्काबुक्की केली. याच्या निषेधार्थ आयएमएने मंगळवारी सर्व खासगी ओपीडी सेवा बंद ठेवली होती. शिवाय संबंधित संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी व जिल्हा प्रशासनाने समज द्यावी, अशी मागणी आयएमएने केली आहे. याच अनुषंगाने मंगळवारी सकाळी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. अनिल पाटील यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले, डॉक्टरांवर होणारे हल्ले हे डॉक्टरांचे नैतिक खच्चीकरण करत आहेत. वैयक्तिक लाभासाठी हेतूतः काही कार्यकर्ते अशी खेळी करत आहेत. डॉ. रोहित जोशी यांनी दाखल झालेल्या रुग्णावर उपचार करण्यात कोठेही हयगय केली नाही. तथापि, असे हल्ले होणे हे वैद्यकीय पेशाच्या भवितव्याच्यादृष्टीने घातक ठरेल. डॉक्टरांनी आजवर बराच संयम बाळगला आहे. मात्र, यापुढे डॉक्टर असे हल्ले खपवून घेणार नाहीत.
डॉ. रोहित जोशी म्हणाले, सदर रुग्णावर दि. 21 रोजी शस्त्रक्रिया केली. त्यावेळी त्याच्या आतडय़ाला गाठ असून ती कर्करोगाची आहे व कर्करोग सर्वत्र पसरतो आहे, हे लक्षात आले. त्यामुळे किमोथेरपीची गरज असल्याने दुसऱया हॉस्पिटलमध्ये जावे लागेल, असे स्पष्ट सांगण्यात आले होते. रुग्णाच्या वडिलांना सर्व कल्पना देण्यात आली होती. परंतु आठवडय़ानंतर धक्काबुक्की व गेंधळ माजविणे या मागील कारण आपल्याला समजले नाही. बिम्सच्या वैद्यकीय संचालकांनीही कार्यकर्त्यांना समजाविले. परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
वैद्यकीय पेशालाच मलिन करण्याचा प्रयत्न
असोसिएशन ऑफ सर्जन्सच्या बेळगाव शाखेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत कुलगोड यांनी शांततेचे प्रतिक असणारा पांढरा रंग ही डॉक्टरांची ओळख आहे. पण आज विविध रंग या पांढऱया रंगावर हल्ले करून वैद्यकीय पेशाला मलिन करत आहेत. डॉक्टरांविरुद्ध हे संघटित हल्ले होत आहेत. आजवर डॉक्टरांनी कधीही कायदा शस्त्र म्हणून वापरला नाही. तथापि, आता डॉक्टरांना लढा देण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे स्पष्ट केले.
आयएमए बेळगावचे सचिव डॉ. देवगौडा यांनी समाजानेसुद्धा डॉक्टरांच्या पाठीशी उभे राहायला हवे. डॉक्टर हासुद्धा माणूस आहे. कोणतेही डॉक्टर रुग्णाचा जीव वाचावा यासाठीच प्रयत्न करतात. मात्र हल्ले, तोडफोड या घटना डॉक्टरांना केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिकदृष्टय़ाही आघात करणाऱया ठरतात. डॉक्टर हा समाजाचा महत्त्वाचा घटक असल्याने समाजानेसुद्धा योग्य बाजूने उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी डॉ. दत्तप्रसाद गिजरे तसेच शहरातील अनेक डॉक्टर उपस्थित होते.
पोलीस प्रशासन-जिल्हाधिकाऱयांना दिले निवेदन
आयएमएच्या सर्व डॉक्टरांनी पत्रकार परिषदेनंतर खडेबाजार पोलीस स्थानकात जाऊन डॉक्टरांना संरक्षण द्यावे, अशी मागणी केली. जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, परशुराम लोकरी या दवाखान्यात दाखल 26 वषीय तरुणावर डॉ. रोहित जोशी यांनी शस्त्रक्रिया केली. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगून त्याला कॅन्सर झाला आहे, त्यादृष्टीने काय उपचार करावे लागतील, हेही स्पष्ट करण्यात आले होते. तथापि, आठ दिवसांनंतर डॉ. रोहित जोशी यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन काही कार्यकर्त्यांनी त्यांना धमकाविले व गोंधळ माजविला.
ही अत्यंत निंदनीय घटना असून दवाखान्यामध्ये गोंधळ माजविणाऱयांवर कारवाई करावी व डॉक्टरांना संरक्षण द्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, सचिव डॉ. देवगौडा, खजिनदार डॉ. रविंद्र अनगोळ, डॉ. रोहित जोशी यांच्यासह आयएमएच्या डॉक्टरांनी हे निवेदन दिले.
चंदगड तालुका मेडिकल असोसिएशनतर्फे डॉ. संजू पाटील आणि सर्व संचालकांनी डॉ. रोहित जोशी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध केला आहे.
डॉक्टरांवर होणारे हल्ले निषेधार्ह असून, यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.