प्रतिनिधी / आटपाडी
आमदार गोपीचंद पडळकर यांनी झरे (ता. आटपाडी) येथे कोर्टाची बंदी असतानाही बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत नियमबाह्य शर्यतीचे आयोजक, संयोजक, स्पर्धक, बघ्यांवरही गुन्हे दाखल करणार, असे स्पष्ट करत कोणत्याही स्थितीत बैलगाडी शर्यती होवू देणार नाही, असा स्पष्ट निर्धार पोलीस व महसुल प्रशसानाने केला.
प्रांताधिकारी संतोष भोर, डीवायएसपी अश्विनी शेंडगे, तहसीलदार बाई माने, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी झरे येथील बैलगाडी शर्यतीच्या अनुषंगाने बैठक घेवून त्या टाळण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनाही बैठकीला निमंत्रीत करण्यात आले होते. आमदार पडळकरांचे प्रतिनिधी बैठकीला हजर होते.
बैलगाडी शर्यती न्यायप्रविष्ट असुन न्यायालयाने त्याला बंदी घातली आहे. त्यामुळे कोर्टाच्या आदेशाचे पालन झाले पाहिजे. कोरोनाचे संकट गंभीर आहे. तिसऱ्या लाटेच्या सुचना तज्ञांनी दिल्या आहेत. शर्यतीच्या निमित्ताने गर्दी करून कोरोनाला वाव मिळणार आहे. कायद्याचे पालन करण्याची प्रत्येकाची जबाबदारी असुन न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून ही शर्यत होणार नाही, यासाठी प्रशासन दक्ष आहे. तरूणांनी बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने गर्दी करत सहभागी होवू नये. त्यांचे करिअर एका गुन्ह्यामुळे बरबाद होईल. त्यामुळे शर्यतीच्या हौसेसाठी आयुष्य बरबाद करून घेवु नका.
गैरपध्दतीने शर्यत आयोजित करणे चुकीचे असुन प्रशासनाला आव्हान देण्याचे काम या निमित्ताने झाले आहे. झरे व पंचक्रोशीत १४४ कलमान्वये संचारबंदी, जमावबंदी आदेश लागु करून पोलीस प्रशासन कडक भुमिका घेत आहे. बैलगाडी शर्यत असलेल्या झरे गावात येणे, तेथून बाहेर जाणे, वाहने, बैलगाड्यांची ये-जा, शेजारच्या तालुका व जिल्ड्यातुन प्रवेशाला मनाई करण्यात येवून चोख पोलीस बंदोबस्त केल्याचे सांगून बैलगाडी शर्यती होणार नाहीत. त्यासाठी आणखी फौज फाटा तैनात करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले.