जग्गू जगजंपी हा माझा बालमित्र जितका प्रेमळ, तितकाच चिडखोर… जमलं तर सूत नाही तर भूत अशा प्रकारातला. मध्यंतरी जग्गू सरकारवर जाम खवळला होता. सर्वत्र कोरोना… सरकारने लॉकडाऊन म्हटलं नव्हतं. पण नियम तसेच लादलेले होते. सासू जशी सुनेला म्हणते, कारल्याचा वेल लाव गं सुने, मग जा आपल्या माहेराला. तसंच सरकार म्हणत होतं, मास्क लाव, लस टोचून घे, गर्दी टाळ, मग जा आपल्या बाहेराला.
जग्गूला गावभर उकिरडे फुंकायची सवय. त्यामुळे ही बंधने अगदी नकोशी झाली होती. त्यात लसीचे तुटवडाकरण झालेले. जग्गू रोज वेगवेगळय़ा केंद्रांचे उंबरठे झिजवायचा आणि ‘लस संपली’ ही घोषणा ऐकून सरकारला शिव्या देत परतायचा. मी त्याला समजावलं, “जग्गू, असा किती दिवस मोफत लसीसाठी तळमळणार आहेस? कोरोनाच्या भीतीने रात्री तळमळत जागा राहणार आहेस? मोफत लस कधी येईल हे त्या ज्योतिषविषयाचा पदवी अभ्यासक्रम सुरू करणाऱया विद्यापीठाच्या प्रमुखांना तरी सांगता येणार आहे का? देवाच्या दयेने तुला चांगली भक्कम पेन्शन आहे. खाजगी रुग्णालयात जाऊन विकतची लस घे. दोन्ही डोस घेतलेस की तुला सुरक्षित झाल्यासारखं वाटेल. धूम्रपान, मद्यपान आदि नामांकित शौक करताना तुला कोरोनाची भीती वाटणार नाही. विचार कर.’’
जग्गूने विचार केला. मग सपत्नीक खाजगी केंद्रावरून लसीकरणाचे रीतसर डोस घेतले. पण मला प्रमाणपत्र दाखवायला आल्यावर त्याच्या मनातली खदखद निघालीच, “मी लस विकत घेतलं. मला सर्टिफिकेट पण भेटली. पण ज्यांना फुकट लस मिळालंय त्यांच्या सर्टिफिकेटवर शेरा पाहिजे की कर भरणाऱया लोकांच्या पैशातून त्यांना फ्री लस मिळालंय.’’
“म्हणजे आयकर भरणाऱया लोकांच्या सौजन्याने असं तुला म्हणायचंय का?’’
“होय.’’
“जग्गू, तू एका वित्तसंस्थेतून अधिकारी म्हणून निवृत्त झालास. तरी तू असा अडाणी राहिलेला बघून वाईट वाटतं. सरकार मोफत लस देतं ते फक्त आयकराच्या महसुलातून हे तुला कोणी सांगितलं? सरकारला आयकर मिळतो. जीएसटी मिळतो. इतर अप्रत्यक्ष कर मिळतात. रस्त्यावर कटिंग चहा पिणारा गरीब माणूसदेखील तो कप, चहापत्ती, साखर, दूध, पातेलं, गॅस, वगैरेच्या निर्मितीवरच्या करातला अंशतः वाटा उचलत असतोच. लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर त्या सर्व करदात्यांचा उल्लेख करायचा का?’’
जग्गू यावर काही बोलला नाही.