दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 13 धावांनी दमदार विजय संपादन केला, त्यात आयपीएल इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकला जाण्याचा विक्रमही नोंद झाला आणि तो विक्रम नोंदवला दिल्ली कॅपिटल्सचा दक्षिण आफ्रिकन जलद गोलंदाज ऍनरिच नोर्त्जे!
26 वर्षीय नोर्त्जेने दुबईत झालेल्या या लढतीत प्रतितास 154.74 व 155.21 किमी वेगाचे चेंडू टाकले आणि त्यानंतर प्रतितास 156.22 किमीचा सर्वोच्च वेगवान चेंडूही टाकला. राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरने हा चेंडू चौकारासाठी फटकावला होता. अर्थात, नोर्त्जेने त्या चौकाराचा वचपा काढण्यासाठी तिसऱया षटकात आणखी भेदक मारा सुरु केला आणि इंग्लिश फलंदाज बटलरला तंबूचा रस्ता दाखवण्यात यशही प्राप्त केले. त्याने या लढतीत 4 षटकांचा कोटा पूर्ण करताना 33 धावात 2 बळी घेतले आणि या हंगामात 8 सामन्यात आपली बळींची संख्या 10 वर नेली.
‘खरं तर आपण वेगवान चेंडू टाकला आहे, याची मला कल्पनाच नव्हती. पण, सातत्याने जलद मारा कसा करता येईल, यावर माझे पूर्ण लक्ष केंद्रित होते. बिनचूक टप्प्यावर गोलंदाजी करणे यावर आपली हुकूमत असायला हवी’, असे नोर्त्जे येथे म्हणाला. राजस्थान रॉयल्सच्या दृष्टीने या लढतीत संघातील अव्वल फलंदाज स्टीव्ह स्मिथचे आणखी एकदा स्वस्तात बाद होणे अधिक चिंतेचे ठरले. त्याला केवळ एकच धाव करता आली.