राहुल तेवातियाचे यापूर्वी आपण नाव ऐकलेही नसेल. पण, शारजात रविवारी त्याने साकारलेली खेळी ज्यांनी पाहिली, ते आता त्याचे नाव विसरुही शकणार नाहीत!
राहुल तेवातिया मूळचा हरियाणाचा. विविध आयपीएल संघांकडून त्याचा प्रवास या संघातून त्या संघात असा राहिला आहे. अर्थात, सर्वोत्तम खेळी साकारण्याची त्याची प्रतीक्षा यंदा मात्र राजस्थान रॉयल्स संघाकडून फळाला आली आहे.
थोडक्यात राहुल तेवातिया
जन्म : 20 मे 1993 (सिही, हरियाणा).
वय : 27
फलंदाजी शैली : डावखुरा फलंदाज
गोलंदाजी शैली : लेगब्रेक गोलंदाज
प्रथमश्रेणी सामने : 7. धावा : 484. सर्वोच्च 91, बळी : 27
टी-20 सामने : 50, धावा : 691, सर्वोच्च : नाबाद 59,
बळी :33
पंजाबचा कर्णधार राहुलने तर ही लढत सहजपणे जिंकता येईल, असे गृहितच धरले होते, असे खुल्या दिलाने कबूल केले. वस्तुस्थितीही यापेक्षा वेगळी नव्हती. 224 धावांचे आव्हान असताना कोणत्याही संघाने विजय गृहित धरला असता तर त्यात गैर नव्हते. पण, राहुल तेवातियाच्या झुंजार खेळीने सारी समीकरणेच बदलून गेली.
प्रारंभी, तेवातिया जरुर झगडत होता. पण, एकदा जोरदार फटकेबाजीला सुरुवात केल्यानंतर त्याला अजिबात मागे वळून पहावे लागले नाही. त्या लढतीत राजस्थानला शेवटच्या 18 चेंडूत 51 धावांची गरज होती आणि याचवेळी शेल्डॉन कॉट्रेलने टाकलेल्या 18 व्या षटकात तेवातियाने 5 षटकार वसूल केले. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकाच षटकात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रमही त्याने आपल्या खात्यावर केला. यापूर्वी हा विक्रम ख्रिस गेलच्या खात्यावर होता.
तेवातिया या सामन्यात विजयश्रीवर शिक्कामोर्तब केले जाण्यापूर्वी बाद झाला. 19 व्या षटकात शमीने त्याची झुंजार खेळी संपुष्टात आणली. पण, त्यापूर्वी त्याने आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली होती. नंतर जोफ्रा आर्चर व टॉम करण यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले!