ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली भाषणे असो अथवा एखाद्या कार्यक्रमातील संवाद, ते नेहमीच आपल्या खास शैलीत उपहासात्मक आणि टीकात्मक भाष्य करून जनतेवर प्रभाव टाकतात. मात्र, मोदींची ही भाषणे लिहितं तरी कोण? असा प्रश्न अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर उपस्थित होत होता. या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीने पंतप्रधान मोदींचे भाषण कोण लिहितं?, त्यासाठी किती लोकांची टीम कार्यरत असते आणि त्यावर किती खर्च होतो, अशी माहिती माहितीच्या अधिकारातून मागवली होती. पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
माहिती अधिकारात मिळालेल्या उत्तरानुसार, ज्याप्रमाणे कार्यक्रम असतो. त्यानुसार वेगवेगळे लोक, अधिकारी, संबंधित विभाग आणि संघटनांशी चर्चा करून भाषणासाठी माहिती गोळा करण्यात येते. या माहितीला भाषणाचे अंतिम स्वरूप स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी देतात. मोदींच्या भाषणावर किती खर्च होतो? याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली नाही.