वार्ताहर / धामोड
कोते (ता. राधानगरी) येथील श्रीमती आनंदी रघूनाथ चव्हाण यांच्या रहात्या घराला आग लागून लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य भस्मसात झाले. हि घटना मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.
कोते गावानजीक असणाऱ्या चव्हाणवाडी येथील श्रीमती आनंदी चव्हाण रात्रीच्या जेवणानंतर झोपी गेल्या. मात्र साडेअकराच्या सुमारास घराला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आरडावोरड करताच घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रुद्र रूप धारण केल्याने आगीत धान्य, कपडे, भांडी, लाकडी साहित्य व घर असे जवळपास दीड-दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनेचा पंचनामा पोलिस पाटील श्रीकांत कांबळे, तलाठी संदिप हजारे यांनी केला. ग्रामस्थांच्या प्रसंगावधनामुळे जीवीतहानी झाली नाही तर आगीचे कारण समजू शकले नाही. सदरच्या महिलेची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरीबीची असून शासकीय स्तरावरून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे.