प्रतिनिधी / बेळगाव
कोनवाळ गल्ली येथील नाल्याची भिंत बांधलेल्या सहा महिन्यातच कोसळली होती. सदर भिंतीचे बांधकाम वर्षभरापासून रखडले होते. हे काम करण्यासाठी शंभर कोटी अनुदानातून एक कोटी पंचवीस लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या कामाचा शुभारंभ गुरुवारी आमदार अनिल बेनके व माजी महापौर सरिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
कोनवाळ गल्ली नाल्याच्या एका बाजूची भिंत कोसळल्याने दोन वर्षांपूर्वी नवीन बांधण्यात आली होती. पण सहा महिन्यात कोसळली होती. त्याचप्रमाणे शिवाजी रोडशेजारीदेखील नाल्याच्या भिंतीचा कठडा कोसळला आहे. त्यामुळे सदर नाला धोकादायक बनला होता. या नाल्याच्या बांधकामासाठी शंभर कोटी अनुदानातून निधीची तरतूद करण्यात आली आहे. न्यूक्लिअस मॉलच्या मागील बाजूपासून सुणगार अड्डय़ापर्यंत एका बाजूच्या भिंतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. शिवाजी रोड येथील भिंतीचेही बांधकाम या निधीमधून करण्यात येणार आहे. सदर नाल्याची भिंत यापूर्वी दगडी बांधकामामध्ये निर्माण करण्यात आली होती. त्यामुळे काही महिन्यातच पावसाच्या पाण्यात वाहून गेली. मात्र, सदर नाल्याच्या भिंतीचे बांधकाम आता सिमेंट काँक्रीटमध्ये करण्यात येणार आहे. नाल्याच्या बांधकामाचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. याप्रसंगी आमदार अनिल बेनके व माजी महापौर सरिता पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी अर्जुन गवळी, बळवंत शिंदोळकर, दिनेश देसूरकर, अभिजीत सुणगार, हावळ, महापालिकेचे साहाय्यक कार्यकारी अभियंते सचिन कांबळे, मंजुश्री एम. आदींसह सिंहगर्जना युवक मंडळाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.