युवा वर्ल्ड तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये भारताला विक्रमी पदके
वृत्तसंस्था/ व्रॉकलॉ, पोलंड
यू-18 मधील वर्ल्ड चॅम्पियन तिरंदाज कोमलिका बारीने यू-21 वयोगटात खेळताना शानदार सुरुवात केली असून तिने येथे झालेल्या युवा वर्ल्ड तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये या गटात जेतेपद पटकावले. असा पराक्रम करणारी ती दीपिका कुमारीनंतरची दुसरी भारतीय महिला तिरंदाज बनली आहे.
कोमलिकाने येथे दोन सुवर्णपदके जिंकली असून पार्थ साळुंखेसमवेत तिने कनिष्ठ मिश्र सांघिकमध्येही सुवर्ण जिंकले आहे. भारताला या स्पर्धेत विक्रमी 8 सुवर्ण, 2 रौप्य व 5 कांस्यपदके मिळाली. रविवारी शेवटच्या दिवशी भारताच्या रिकर्व्ह संघाने कनिष्ठ (यू-21) गटात तीन तर कॅडेट (यू-18) गटात 2 सुवर्णपदके मिळविली. कॅडेट गटात बिशाल चांगमाईने 2 सुवर्णपदके मिळविली. याशिवाय कॅडेट विभागात महिला सांघिक व वैयक्तिक तसेच पुरुषामध्ये वैयक्तिक अशी तीन कांस्यपदकेही भारताला मिळाली. त्याआधी कंपाऊंड विभागात भारताने 3 सुवर्ण, 2 रौप्य व 2 कांस्यपदके मिळविली होती. मात्र कोरिया व चीन या बलाढय़ देशांनी या स्पर्धेतून माघार घेतल्याने त्याचा फायदाही भारताला झाला. यापूर्वी 2019 मध्ये झालेल्या शेवटच्या स्पर्धेत भारताने 2 सुवर्ण व 1 कांस्यपदक मिळविले होते.
19 वर्षीय कोमलिकाने अंतिम लढतीत 1-3 ची पिछाडी भरून काढत स्पेनच्या इलिया कॅनालेसवर 7-3 अशी मात केली. यापूर्वी फक्त दीपिकाने कॅडेट व कनिष्ठ गटात जेतेपद पटकावले होते. मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत कोमलिका व पार्थ यांनी स्पेनच्या जोडीचा 5-3 असा पराभव केला. महिला संघातून खेळताना कांस्यपदकाच्या लढतीत भारताला युक्रेनकडून 1-5 असा पराभव स्वीकारावा लागल्याने कोमलिकाचे तिसरे पदक हुकले. भारताला तिसरे सुवर्ण रिकर्व्ह कनिष्ठ पुरुष संघाने मिळवून दिले. साळुंखे, आदित्य चौधरी, धीरज बोम्मदेवरा यांनी स्पेनच्या प्रतिस्पर्ध्यांवर 5-3 अशी मात केली. तत्पूर्वी या पुरुष संघाने फ्रान्सचा 5-3 तर मिश्र दुहेरीत जपानवर 6-2 अशी मात केली होती.
कॅडेटमध्ये अग्रमानांकित बिशाल, अमित कुमार, विकी राहुल या पुरुष संघाने फ्रान्सच्या त्रिकुटाला 5-3 असे नमवित सुवर्ण घेतले. बिशाल चांगमाईने वैयक्तिक दुसरे सुवर्ण मिळविताना तमन्नासमवेत मिश्र दुहेरीत प्रतिस्पर्ध्यांवर 6-2 असा विजय मिळविला. त्यानंतर त्याने तिसरे पदक पटकावताना वैयक्तिक गटात कांस्यपदकाच्या लढतीत कझाकच्या झांगबायबे दौलतकेल्दीवर 6-4 अशी मात केली.