प्रतिनिधी/ नवारस्ता
पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने गुरुवारी कोयना धरणाचे बंद करण्यात आलेले सहा वक्र दरवाजे शुक्रवारी पुन्हा सकाळी प्रथम दीड फूट आणि सायंकाळी पुन्हा चार फूट उचलून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 27 हजार 499 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून कोयना पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे धरणाचे सहा वक्र दरवाजे 14 ऑगस्टपासून उघडले होते. दहा फुटांपर्यंत दरवाजे उचलून सुमारे 56 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू होता. त्यामुळे पाटण कराड आणि सांगली परिसरात पुराचा धोका निर्माण झाला होता.
बुधवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने गुरुवारी सकाळी धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले. मात्र गुरुवारी पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने शुक्रवारी सकाळी 11 वाजता धरणाचे दरवाजे प्रथम दीड फूट व नंतर सायंकाळी साडेपाच वाजता चार फूट उचलून नदीपात्रात 25 हजार 399 आणि धरणाच्या पायथा वीजगृहातून केवळ 2100 क्युसेक असे मिळून एकूण 27 हजार 499 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात 94.62 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.