प्रतिनिधी/ नवारस्ता
कोयना पाणलोट क्षेत्रातून सध्या मोठय़ा प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने कोयना धरणात पाणी मावेना अशी अवस्था कोयना धरणाची झाली असल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रणासाठी शनिवारी धरणाचे सहा वक्र दरवाजे पुन्हा साडेदहा फूट उचलून कोयना नदीपात्रात 52 हजार 179 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी पावसाचा जोर कमी झाला.
गेल्या पंधरा दिवसांत कोयना पाणलोट क्षेत्रात सलग कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पाणलोट क्षेत्रातील छोटे-मोठे धबधबे, नद्या, तलाव, बंधारे ओसंडून वाहिल्याने सध्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी-जास्त असतानाही मोठय़ा प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. शुक्रवारी पावसाचा जोर वाढला; मात्र शनिवारी पुन्हा कमी झाला. मात्र शनिवारी सायंकाळपर्यंत कोयना धरणात प्रतिसेकंद 41 हजार 502 क्युसेक पाण्याची आवक सुरू झाली. परिणामी कोयना धरणातील सध्याचा पाणीसाठा नियंत्रण पाणीपातळीपेक्षा जास्त होत आहे.
यासाठी कोयना सिंचन विभागाने धरणाचे सहा वक्र दरवाजे पुन्हा वर उचलण्याचा निर्णय घेऊन पावणे दहा फुटांवर असलेले दरवाजे आज शनिवारी सकाळी 10 वाजता साडेदहा फुटांवर उचलण्यात आले. त्यामुळे कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 52 हजार 179 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
कोयना नदीला पूर आला असून नदीवरील संगमनगर धक्का जुना पूल, निसरे फरशी यासह मुळगाव पूलही अद्याप पाण्याखालीच आहे. कोयना-कृष्णाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, शनिवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत कोयनानगर येथे 25 (3117) मिलिमीटर, नवजा येथे 39 (3968) मिलिमीटर आणि महाबळेश्वर येथे 24 (4045) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा 87.52 टीएमसी झाला आहे.