दरवाजे 10 फुटांवर, 51 हजार 185 क्युसेक विसर्ग, मूळगाव पूल पाण्याखाली, दक्षतेचा इशारा
प्रतिनिधी/ नवारस्ता
कोयना धरणातील पाणीपातळी नियंत्रणासाठी शुक्रवारी धरणाचे साडे पाच फुटांवरून पावणे दहा फुटांवर उघडण्यात आलेले सहा वक्र दरवाजे शनिवारी पावणे दहा फुटांवरच स्थिर ठेवण्यात आले. त्यामुळे कोयना धरणातून प्रतिसेकंद 51 हजार 185 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. दरम्यान कोयना नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाल्यामुळे कोयना नदीवरील मुळगाव पूल पुन्हा पाण्याखाली गेल्याने नदीपलीकडील गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान गेल्या चार दिवसांपासून कोयना पाणलोट क्षेत्रातील कमी झालेला पावसाचा जोर शनिवारी पुन्हा वाढला.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात 23 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा कहर होता. मात्र 24 जुलैपासून पावसाचा जोर कमी झाला होता. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठय़ाने नव्वदी ओलांडल्याने गुरुवार 29 रोजी सकाळी 9 वाजता धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सकाळी 11 वाजता धरणाची वक्रद्वारे 9 फूट उचलून सांडवा व पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण 49 हजार 300 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आले. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता पुन्हा पावणेदहा फूट उचलून 51 हजार 987 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला. मात्र कोयना पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी दिवसभर पावसाचा जोर पुन्हा वाढल्यामुळे धरणाची दारे शुक्रवारी ही 9 फूट 9 इंचावर म्हणजे पावणे दहा फुटांवर कायम ठेवण्यात आली.
कोयना धरणातून सुरू असलेल्या या प्रचंड विसर्गामुळे कोयना नदीला पूर आला असून नदीवरील मुळगाव पूल पुन्हा पाण्याखाली गेला आहे. तर संगमनगर धक्का जुना पूल, निसरे फरशी हे गेल्या सहा दिवसांपासून पाण्याखालीच आहेत. दरम्यान नदीपलीकडील गावांचा संपर्क तुटला आहे. कोयना धरणात प्रतिसेकंद 50 हजार 185 क्युसेक पाण्याची आवक सुरू असून प्रशासनाने कोयना कृष्णा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
महाबळेश्वरने चार हजाराचा टप्पा ओलांडला
गेल्या चोवीस तासांपासून कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढल्यामुळे कोयनानगर, नवजा पर्जन्यमापन केंद्रांनी तीन हजारांचा आणि महाबळेश्वर पर्जन्यमापन केंद्राने शुक्रवारी चार हजार मिलिमीटर पावसाचा टप्पा ओलांडला .शुक्रवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत कोयनानगर येथे 27 (3074) मिलिमीटर नवजा येथे 40 (3898) मिलिमीटर आणि महाबळेश्वर येथे 55 (4013) मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून धरणातील पाणीसाठा 85.75 टीएमसी झाला आहे.