वार्ताहर / पाचगणी :
महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बामणोली, तापोळा, कोयना, सोळशी, कांदाटी कोयना विभागामध्ये पर्यटन वाढीच्या दृष्टिकोनातून राज्यस्तरावरून ठोस उपाययोजना करण्यात येईल, असे सुतोवाच महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
कोयना विभागातील उतेश्वर (ता.महाबळेश्वर) येथील पांडवकालीन उतेश्वर मंदिराचे भूमिपूजन करत असताना ते बोलत होते. यावेळी कल्याण-डोंबिवलीचे शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, महाडचे शिवसेनेचे आमदार भरत शेठ गोगावले यासह मुंबई-ठाणे विभागातील नगरसेवक, कोयना-कांदाटी-सोळशी विभागातील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आज सकाळी अकराच्या सुमारास शुभमुहूर्तावर उतेश्वर पांडवकालीन मंदिराचे भूमिपूजन विधिवत होम-हवन विधी करून पार पाडून करण्यात आले.
यावेळी मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोयना विभागामध्ये निसर्गाचा अलौकिक ठेवा आहे. निसर्गसंपदा लाभलेला हा परिसर खऱ्या अर्थाने मिनी काश्मिर म्हणून सत्यात उतरवावा, यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमोर या विभागातील पर्यटनाच्या दृष्टिकोनातून व्हिजन प्लॅन तयार करण्यात येणार आहे. विभागातील पर्यटनाला तसेच साधन सुविधा दळणवळण या दृष्टिकोनातून भरीव निधी देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी नदी म्हणून ओळखली जाणारी कोयना व कोयना धरणाचा बॅकवॉटर शिवसागर जलाशय अत्याधुनिक बोटिंग पर्यटन विकसासाठी राज्य स्तरावर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दुर्गम डोंगरी विभागाला जलाशयातून जोडण्यासाठी 265 कोटींचा भला मोठा पूल बांधण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आले असून येत्या काही महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, असा विश्वास देखील शिंदे यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, एकनाथ कांबळे, विश्वनाथ धनवडे, संजय मोरे, गणेश उतेकर आदी उपस्थित होते.