गुंतवणूकदारांनी गमावले 5 लाख कोटी, तेलाच्या दराचीही प्रचंड घसरगुंडी, दर 30 डॉलरच्या आसपास
वृत्तसंस्था / मुंबई
कोरोना विषाणूचा प्रभाव, येस बँकेचे आर्थिक संकट आणि कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये 30 टक्क्मयांपर्यंत झालेली घसरण यामुळे सोमवारी शेअर बाजाराची सोमवारी अक्षरशः दाणादाण उडाली आहे. एका दिवसात मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 1941.67 अंकांची घसरण झाली. 2008 पासूनची ही एका दिवसाताअखेरीची सर्वात मोठी घसरण आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे किमान 5 लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले असावे असे अनुमान आहे.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 35,634.95 अंकांवर बंद झाला. सोमवारी एका क्षणी ही घसरण 2448 अंकांची होती. दिवसांतर्गत घसरणीचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 538 अंकांनी घसरत 10,451.45 अंकांवर बंद झाला. या वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत सेन्सेक्स 5672 अंकांनी (जवळपास 13.73 टक्क्मयांनी) घसरला असून, निफ्टीतही हीच स्थिती आहे. निफ्टी दोन महिन्यांत 1731 अंक म्हणजेच 14.2 टक्क्मयांनी घसरला आहे.
2015 पेक्षाही अधिक
यापूर्वी 24 ऑगस्ट 2015 रोजी सेन्सेक्समध्ये 2200 अंकांची सर्वात मोठी दिवसांतर्गत घसरण नोंद झाली होती. चालू वर्षाच्या सुरुवातीच्या एकूण 69 दिवसांमध्ये सेन्सेक्स 5672 अंकांनी घसरला आहे. 1 जानेवारीला सेन्सेक्स 41 हजार 306 अंकांवर होता. त्यानंतर तो 13.73 टक्क्मयांनी घसरला आहे. या घसरणीमुळे सेन्स्sक्स 35,634.95 अंकांवर आला आहे. यापूर्वी 15 जून 2018 रोजी सेन्सेक्स 35,622 अंकांवर होता.
निफ्टीचीही हीच स्थिती
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सोमवारी सकाळी 318.95 अंकांच्या घसरणीसह सुरू झाला. सकाळी 11.15 वाजेपर्यंत तो 417.05 अंकांपर्यंत घसरला होता. दुपारी 1.30 वाजेपर्यंत 638 अकांच्या घसरणीमुळे तो 16 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला. यावषी निफ्टी 1731 अंकांनी खाली आला आहे. 1 जानेवारीला निफ्टी 12 हजार 182 अंकांवर होता.
मार्च 2020 मध्ये परकीय गुंतवणूकदारांनी आतापर्यंत फक्त 5 सत्रांमध्ये भारतीय भांडवल बाजारातून 13,157 कोटी रुपये काढले. केवळ भारतातच नव्हे र जगातील सर्व भागबाजारांनी गुंतवणूकदारांचा विश्वास गमावल्याचे दिसून येत आहे. जपानच्या निक्केई 5.2 टक्के तर ऑस्ट्रेलियन कमोडिटी बाजार 6.4 टक्क्यांनी घसरले. तर डाय जोन्स 256 अंकांनी आणि नॅस्डेक 161 अंकानी घसरले आहे. ब्रिटनचा एफटीएसई 418 अंकांनी तर हँगसेंग 1106 आणि कोस्पी 4 टक्क्यांनी खाली आला आहे. सर्वच प्रमुख भागबाजार घसरले आहेत.
कोरानाचा प्रभाव सर्वाधिक
चीनच्या वुहानपासून सुरू झालेल्या कोरोना विषाणूचा जगभरातील बाजारपेठेतील अनेक क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. फार्मा, ऑटोमोबाईल, स्मार्टफोनसारख्या निर्मिती उद्योगांवर परिणाम झाला आहे. याचा परिणाम सोमवारी जगभरातील सर्व प्रमुख बाजारातही दिसून आला. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, जपान, हाँगकाँगसह जगातील सर्व बाजारामध्ये घसरण दिसून आली. भारताचा विचार करता, येस बँक प्रकरणाचाही या घसरणीत वाटा असल्याचे तज्ञांचे मत आहे.
सर्वाधिक फटका अंबानींना
अंबानी उद्योगसमूहाला सोमवाराच्या घसरणीचा सर्वात मोठा दणका बसला. या समूहाच्या समभागांची किंमत 9 टक्क्यांनी घसरली. त्यामुळे भारतातील सर्वात श्रीमंत म्हणून गणल्या जाणाऱया मुकेश अंबानी यांनी संपत्ती 50 हजार कोटींहून अधिक रकमेने कमी झाली आहे.
कोरोनाची ‘करणी’…तेलाचे ‘पाणी’
सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यातील ‘तेलदर युद्धा’चा परिणाम म्हणून सोमवारी सौदी अरेबियाने कच्च्या इंधन तेलाचे उत्पादन वाढविल्याने जागतिक तेल बाजार 20 टक्क्यांहून अधिक प्रमाणात आपटला. गेल्या 10 वर्षांमधील ही सर्वात मोठी एक दिवशीय घसरण मानली जात आहे. गेल्या शनिवारी साधारणतः 43 डॉलर्स किमतीला मिळणारे तेलाचे पिंप सोमवारी एका क्षणी 30 डॉलर्सपर्यंत घसरणे होते. नंतर त्यात काहीशी वाढ होऊन ते 32 डॉलरवर स्थिरावले. उच्च प्रतीचे ब्रेंट क्रूड’ तेलही 36 डॉलर्सच्या आसपास स्थिरावले. तेलाचे हे दर काही दिवस असेच राहिले, तर भारतात पेट्रोल व डिझेलच्या दरात 5 ते 8 रूपये प्रतिलीटर कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, ही कपात येत्या काही दिवसांमधील तेलदरस्थितीवर अवलंबून राहील, असे तज्ञांचे प्रतिपादन आहे.
घसरणींचा विक्रमदिन…
- शेअरबाजारात आतापर्यंतची सर्वात मोठी दिवसांतर्गत घसरण
- पेट्रोलियम कंपन्यांचा अपवाद वगळता सर्व क्षेत्रांमध्ये हाहाकार
- कच्च्या इंधन तेलाच्या दराचाही दिवसांतर्गत घसरणीचा विक्रम
- स्थिती अशीच राहिल्यास भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्ताई शक्य
- गुंतवणूक करताना सावधानता बाळगण्याची शेअरतज्ञांची सूचना