वृत्तसंस्था/ सेऊल
रविवारी येथे झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या कोरिया खुल्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत चीनच्या वेंग हाँग यांगने पुरूष एकेरीचे तर दक्षिण कोरियाच्या ऍन सेयुंगने महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले.
पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या वेंग यांगने इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्टीचा 12-21, 21-19, 21-15 असा धक्कादायक पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. चीनचा यांग मानांकनात 156 व्या तर इंडोनेशियाचा ख्रिस्टी आठव्या स्थानावर आहेत. सुपर 500 दर्जाच्या कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत चीनच्या यांगने पहिला गेम गमविल्यानंतर पुढील दोन गेम्समध्ये दर्जेदार खेळ करत ख्रिस्टीचे आव्हान संपुष्टात आणले.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाच्या ऍन सेयुंगने थायलंडच्या पी. चोचुवाँगचा 21-17, 21-18 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत अजिंक्यपद मिळविले. हा अंतिम सामना 52 मिनिटे चालला होता. या स्पर्धेत मलेशियाच्या तेन कियान मेंग आणि लेई पेई जिंग यांनी मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद मिळविले. कोरियाच्या जेयांग इयुन आणि किम जेयाँग यांनी महिला दुहेरीचे तसेच कोरियाच्या केंग मिनयूक आणि सेंगजी यांनी पुरूष दुहेरीचे अजिंक्यपद मिळविताना माजी विजेत्या फेजार अलफियान आणि मुहम्मद आद्रियांतो यांचा पराभव केला.