वाठार किरोली / वार्ताहर:
ग्रामीण रुग्णालय कोरेगाव रुग्णालयात पहिल्यांदाच गर्भाशयाच्या पिशवीमध्ये असलेली गाठ काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. महाराष्ट्रातील ग्रामीण रुग्णालय स्तरावर पहिल्यांदाच अशी शस्त्रक्रिया कोरेगाव तालुक्यात लॅप्रोस्कोपी पद्धतीची यशस्वीरीत्या पार पडली.
महिलेच्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये असलेल्या गाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच अशी शस्त्रक्रिया पार पडल्याने रुग्णालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र , ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय अशी आरोग्य विभागाची रचना आहे. त्यामध्ये ग्रामीण रुग्णालय हे सर्वसामान्य नागरिकांना तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुविधा देण्यामध्ये मोलाची भूमिका बजावत असते. त्यामुळे खाजगी रुग्णालयातील उपचारांचा व शस्त्रक्रियांचा खर्च पेलू न शकणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची मोठी सुविधा होत असते.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यापासून ग्रामीण रुग्णालयामध्ये अधिकाधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमातील पुढचे हे पाऊल ग्रामीण रुग्णालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच स्त्रीरोगतज्ञ डॉ. युवराज सुधाकर करपे यांनी दुर्बीणीच्या सहाय्याने गर्भाशयाच्या पिशवीमध्ये असलेली गाठ शस्त्रक्रिया करून काढली आहे. ग्रामीण रुग्णालयात आतापर्यंत ओपन सर्जरीच होत होत्या. आजपर्यंत कधीही दुर्बिणीच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करण्यात आलेली नव्हती. दुर्बीणीद्वारे शस्त्रक्रिया केल्यास ओपन शस्त्रक्रियेपेक्षा कमी चिरफाड करावी लागते. त्यामुळे सहाजिकच टाकेही कमी लागतात परिणामी रुग्णाला दवाखान्यातून तीन दिवसांतच सोडता येते. त्यामुळे रुग्णांना अशा शस्त्रक्रियांसाठी खासगी रुग्णालयांची वाट धरावी लागत होती. त्यासाठी सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता.
या शस्त्रक्रियेसाठी लागणारी सर्व अत्याधुनिक उपकरणे जसे कॅमेरा, Co२ इन्सुफोलेटर, लाईट सोर्स Cautery हे सर्व डॉ. युवराज करपे यांनी स्वतः खर्च करून आणले होते. या शस्त्रक्रियेसाठी ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील कार्यरत डॉ. संजय चिवटे, डॉ. निलेश दबडे, डॉ. अरुण जाधव, डॉ. ओंकार भंडारे, डॉ. इंदिरा पाटील तसेच सर्व अधिपरीचारीका व वार्ड बॉय यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.