प्रतिनिधी/ कोरेगाव
कोरेगाव पोलीस ठाण्याचा नुकताच पदभार घेतलेल्या परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यास सुरुवात केली आहे. सात दिवसांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक पोलिसांनी 729 जणांकडून 1 लाख 73 हजार 900 रुपयांचा दंड आकारणी केली आहे. केवळ कारवाई करुन त्या थांबत नाहीत, तर जे वाहतुकीचे नियम पाळत आहेत, त्यांचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करत आहेत.
अनलॉक महाराष्ट्र अंतर्गत सर्व व्यवहार व व्यवसाय सुरळीत झाले आहेत, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मोठी गर्दी होऊ लागली आहे, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे वाहतुकीला शिस्त लावण्याबरोबरच कोरोनाला रोखण्यासाठी खोखर यांनी महत्वपूर्ण भूमिका घेतली आहे.
शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सातारा-लातूर महामार्गावर आझाद चौक परिसरात त्या स्वत: थांबतात. वाहतुकीचे नियम मोडणार्यांबरोबरच विना मास्क फिरणारे, हेल्मेट न वापरणारे, खराब नंबरप्लेट, सिटबेल्ट न वापरणे, नंबर प्लेट नसणे, खराबपध्दतीने वाहन चालविणे, दुचाकीवर अथवा चार चाकी वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे त्याचबरोबर सामाजिक अंतर न पाळणार्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
वाहतूक शाखेचे हवालदार महादेव खुडे, समाधान गाढवे, महेश जाधव, अतुल कणसे यांच्यासह पोलीस कर्मचारी इंद्रजित भोसले, निलेश जांभळे यांनी 729 जणांवर दंडात्मक कारवाई केली असून, त्यातून 1 लाख 73 हजार 900 रुपयांचा दंड वसूल केला आहे. साधारणत: एक महिन्यात होणारी दंडात्मक कारवाई रितू खोखर यांनी केवळ सात दिवसात करुन दाखविली आहे.
नियमांचे काटेकोर पालन अपेक्षित : खोखर
सध्या कोरोनाने सगळीकडे धुमाकूळ घातला असून, कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वांनी शासनाने घालून दिलेले नियम पाळणे बंधनकारक आहे. सर्वांनी नियमांचे पालन करुन पोलीस दलाला सहकार्य करावे, असे आवाहन रितू खोखर यांनी केले आहे.