- पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून सतर्कतेचा इशारा
ऑनलाईन टीम / पालघर :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असतानाच आता राज्यात आणखी एका विषाणू चे आगमन होण्याची शक्यता आहे. ‘क्रायमिन काँगो हेमोरेजिक फिव्हर ‘ (CCHF) असे या नव्या विषाणूचे नाव आहे. त्यामुळे सध्या पशुपालकांमध्ये, मांस विक्रेत्यांमध्ये आणि पशुसंवर्धन अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा रोग गुजरातमधून महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या जिल्ह्यात पसरण्याची शक्यता असल्याने पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयामार्फत या रोग संबंधी परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
महाराष्ट्रामध्ये गोचिडांमुळे क्रायमिन काँगो हेमोरेजिक फिव्हर या साथीच्या रोगाची लागण होण्याची शक्यता असल्याने राज्याच्या सीमा भागातील पशुपालक आणि मांस विक्रेत्यांनी सतर्क राहण्याचे अहवान पालघरचे जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी केले आहे.
सदर विषाणूजन्य रोग एका विशिष्ट प्रकारच्या गोचीडाद्वारे एका जनावरांमधून दुसऱ्या जनावरांना होतो. ऑस्ट्रीच, शहामृग या पक्षाद्वारे देखील या रोगाचा प्रसार होण्यास मदत होते. बाधित जनावरांच्या रक्ताच्या संपर्कात आल्याने व बाधित जनावरांचे मांस खाल्याने या रोगाचा प्रादुर्भाव मानवामध्ये दिसून येतो.
या रोगाची लागण झाल्यास वेळीच निदान व उपचार न झाल्यास 30% मनुष्यामध्ये मृत्यू होतो. या रोगावर हमखास व उपयुक्त असे उपचार नसल्याने वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पालघर डॉ प्रशांत कांबळे यांनी दिली आहे.