जिल्हाधिकाऱयांचे आवाहन : खासगी हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांची बैठक घेऊन कोविड रुग्णांवरील उपचाराबाबत केली चर्चा
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुळे सर्वसामान्य जनता अडचणीत आली आहे. या काळात सर्वांनी मदतीचा हात पुढे करणे महत्त्वाचे आहे. खासगी हॉस्पिटलांची भूमिका आता महत्त्वाची आहे. सरकारच्या मार्गसूचीचे पालन करत कोविड रुग्णांवर उपचार करावेत आणि सर्वांनीच योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले आहे.
बुधवारी जिल्हाधिकाऱयांनी खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांची बैठक घेऊन कोविड रुग्णांवर केले जाणारे उपचार व आकारल्या जाणाऱया शुल्क यावर जोरदार चर्चा केली. यावेळी खासगी हॉस्पिटलच्या संचालकांनी येणाऱया अडचणींची माहिती जिल्हाधिकाऱयांना दिली. खासगी हॉस्पिटलमध्ये 50 टक्के बेड आयुष्मान योजनेंतर्गत उपचार घेणाऱया रुग्णांसाठी राखीव ठेवावेत, असा आदेश सरकारने दिला आहे. याबद्दल खासगी हॉस्पिटलच्या संचालकांनी होकार दिला. मात्र, सरकारने निश्चित केलेला दर परवडणारा नाही. त्यात वाढ करावी, अशी मागणी आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी केली आहे.
यावेळी डॉ. अनिल पाटील म्हणाले, 5 हजार 200 रुयपे जो दर जाहीर केला आहे त्यामध्ये औषधे, सीटी स्कॅन तसेच उपचार करणे परवडणारे नाही. खासगी हॉस्पिटलनाही इतर खर्च अधिक करावा लागतो. त्याचा विचार होणे गरजेचे असून त्या दरामध्ये वाढ करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी जिल्हाधिकाऱयांनी खासगी हॉस्पिटल संचालकांच्या समस्यांचा सरकारकडे पाठपुरावा करू व समस्या दूर करू, असे आश्वासन दिले. बैठकीला जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., केएलई हॉस्पिटलचे संचालक डॉ. एम. व्ही. जाली, डॉ. देवेगौडा, डॉ. कुलगोड यांच्यासह इतर डॉक्टर उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाला सर्व ते सहकार्य करू !
मागीलवर्षी कोरोनाकाळात उपचार केलेली बिले सरकारकडून अद्याप हॉस्पिटलना दिली गेली नाहीत. त्यामुळे आम्ही अडचणीत आलो आहे. कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारने हॉस्पिटलना आगाऊ रक्कम द्यावी, अशी मागणीदेखील डॉ. अनिल पाटील यांनी केली आहे. खासगी रुग्णालयावरही मोठा ताण पडत आहे. तेव्हा सरकारने याचा विचार करून हॉस्पिटलना मदत करणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आम्ही जिल्हा प्रशासनाला सर्व ते सहकार्य करू, असे आश्वासन देखील त्यांनी दिले.