औषध निर्मितीसाठी लोटेतील कंपनीला केंद्राचा परवाना
प्रतिनिधी/ चिपळूण
सध्या जगात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूवर परिणामकारक ठरलेल्या हायड्रोक्सोक्लोरोक्वीन गोळीसाठी लागणारा कच्चा माल तयार करण्याचा परवाना खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया लाईफसायन्स कंपनीला मिळाला आहे. केंद्र सरकारकडून असा परवाना मिळालेली ही राज्यातील एकमेव कंपनी असल्याने कंपनीचे अध्यक्ष व प्रसिध्द उद्योजक डॉ. सतीश वाघ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जगभर थैमान घालणाऱया कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शास्त्रज्ञ औषधे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाग्रस्तांना बरे करण्यामध्ये काही औषधे उपयुक्त ठरत आहेत. त्यापैकी सालबुटामॉल सल्फेट आणि सिट्राजिन हायड्रोक्लोराईड ही औषधे लोटेतील सुप्रिया लाईफसायन्स लिमिटेड अनेक वर्षापासून तयार करीत आहे. या आजारावर हायड्रोक्सोक्लोरोक्वीन औषध उपयुक्त ठरत असल्याचे अनेक क्लिनीकल ट्रायल्सनंतर सिद्ध होत आहे. डॉ. वाघ यांच्या कंपनीतील पदाधिकाऱयांशी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे सुप्रिया लाईफसायन्स लिमिटेड या राज्यातील एकमेव कंपनीला हायड्रोक्सोक्लोरोक्वीन गोळय़ासाठीसाठी लागणाऱया औषधीय कच्च्या मालाचे उत्पादन करण्यासाठी लागणारे टेस्ट लायसन्स नुकतेच प्राप्त झाले आहे.
कंपनी रेमडेसीवीर या औषधावरही काम करत असून हे औषध लवकरच बाजारात आणण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीकडे हायड्रोक्सोक्लोरोक्वीन सल्फेट या औषधीय कच्चा मालाचे उत्पादन करण्यासाठी परवाना प्राप्त झाला असून कंपनी येत्या 1 ते 2 महिन्यात या औषधीय कच्च्या मालाचे उत्पादन नियमित करण्याच्या प्रयत्नात आहेत. कोरोना रूग्णांना वेळेत बरे होता यावे, तसेच औषधांचा तुटवडा होऊ नये, यासाठी कंपनीचे अधिकारी कामाला लागले आहेत. ‘सुप्रिया’ने आपल्या 34 वर्षांच्या प्रवासामध्ये जगातील 155 देशांमध्ये आपले वर्चस्व स्थापित केले आहे.
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया लाइफ सायन्स कंपनीला केंद्र सरकारकडून कोरोनावरील या औषधासाठीचा कच्चा माल तयार करण्याची विशेष परवानगी प्राप्त झाली आहे. केरोनावर औषध तयार करण्यासाठी जगभरातील कंपन्या व वैद्यकीय शास्त्रज्ञ प्रयत्न करत असताना त्या प्रयत्नांचा एक भाग होण्याची संधी रत्नागिरी जिल्हय़ाला प्राप्त झाल्याबद्दल विशेष कौतुक होत आहे.