ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोविड रुग्णांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यांनी सांगितले की, ज्यांना गरज आहे, पण त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, अशा नागरिकांनाही रेशन दिले जाणार आहे. प्रत्येक गरजू लोकांना महिन्याला 10 किलो रेशन दिले जाणार आहे.
यासोबतच ज्या लहान मुलांच्या आई वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे अशा मुलांच्या शिक्षणाचा खर्च दिल्ली सरकार करणार असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले, जर एखाद्या घरातील व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाले असल्यास त्या कुटुंबास 50 हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. तसेच जर एखाद्या घरात काम करणारा एकच व्यक्ती असेल आणि त्याचा कोरोनाने मृत्यू झाला असल्यास संबंधित परिवाराला प्रति महिना 2500 रुपये पेन्शन दिली जाणार असल्याचे केजरीवाल यांनी यावेळी सांगितले.
- केजरीवाल यांनी केलेल्या 4 घोषणा :
1. दिल्लीत 72 लाख नागरिकांकडे रेशन कार्ड आहे. सरकारकडून या नागरिकांना 5 किलो रेशन दिले जाते. या महिन्यात या नागरिकांना मोफत रेशन दिले जाणार आहे. यासोबत केंद्रातील योजने अंतर्गत अधिकचे 5 किलो रेशन देण्यात येणार आहे. तर ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशा लोकांनाही रेशन दिले जाणार आहे.
2. ज्या नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशा नागरिकांच्या कुटुंबास 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
3. जर एखाद्या कुटुंबात एकच व्यक्ती कमावता असेल आणि त्यांचे कोरोनाने निधन झाले असल्यास संबंधित परिवारास 50 लाख रुपये मदत आणि प्रत्येक महिन्याला 2500 रुपये पेन्शन दिली जाणार आहे.
4. ज्या मुलांच्या आई वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे आणि जे अनाथ झाले आहेत अशा मुलांना त्यांच्या वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत प्रति महिना 2500 -2500 रुपये दिले जाणार आहेत. तर त्यांच्या शिक्षणाचा आणि पालन पोषणाचा खर्च दिल्ली सरकार करणार आहे.