प्रतिनिधी/ बेळगाव
आज प्रत्येकजण कोरोनाविरुद्धच्या लढय़ात सहभागी झाला आहे. कोणी हॉस्पिटलमध्ये राहून रुग्णांची सेवा करताहेत तर पोलीस गर्दी होणार नाही याची खबरदारी घेत आहेत. सर्वसामान्य नागरिक घरी राहून या कोरोनाविरुद्धचा लढा अधिक बळकट करीत आहेत. परंतु सध्या देशासमोर आर्थिक संकट निर्माण झाले असून यातून बाहेर पडण्यासाठी सर्वांनी सढळ हस्ते मदत करणे गरजेचे आहे. यासाठी बेळगावच्या नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
बापट गल्ली येथे राहणाऱया महेश पावले यांनी 21 हजार रुपयांचा धनादेश पंतप्रधान साहाय्यता निधीला दिला आहे. जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला. देशभर करावा लागणारा खर्च सरकारला परवडणारा नसल्यामुळे नागरिकांनी आपल्या ऐपतीप्रमाणे मदत करण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार नागरिकांना मदत करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये बेळगावकरांनी पुढाकार घेतला आहे.
उद्योगपती, व्यावसायिकांकडून मोठमोठी मदत केली जात आहे. त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकही कमी नाहीत. छोटे व्यावसायिक असणारे महेश पावले यांनी आपल्या एका महिन्याची रक्कम देशासाठी दिली आहे. अशीच मदत इतरांनीही करणे गरजेचे आहे. प्रत्येकाला देशाने भरपूर काही दिले आहे. आता देश अडचणीत असताना आपणच मदत करणे गरजेचे आहे, असे मत महेश यांनी व्यक्त केले.
चुकीच्या खाते क्रमांकापासून सावधान
थेट बँक खात्यावर रक्कम जमा करण्याची सोय करण्यात आली आहे. पेटीएम, गुगल पे यासारख्या ऍपमधूनही रक्कम जमा करता येते. याचाच फायदा उठवत सोशल मीडियावर अनेक चुकीचे खाते क्रमांक देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी शहानिशा करूनही मदत करावयाची आहे.
येथे जमा करा निधी –
बँक खाते- PM CARES
खाते क्र.- 2121PM20202
आयएफएससी कोड- SBIN0000691
स्टेट बँक ऑफ इंडिया (नवी दिल्ली).