प्रतिनिधी/दापोली :
दापोलीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण लघुशंकेच्या बहाण्याने जंगलात पळून गेल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. पोलीस व ग्रामस्थांनी तब्बल 12 तास जंगल पिजून काढत गुरुवारी दुपारी या तरुणाला विलगीकरण कक्षात आणले. मध्यरात्रीच्या सुमारास आपण कोरोनाबाधित असल्याचे समजल्याने घाबरून पोबारा केलेल्या या रुग्णाला शोधण्यामध्ये प्रशासनाची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
बुधवारी आढळलेल्या चार नवीन रुग्णांमुळे दापोली तालुक्यात सध्या 12 कोरोनाबाधित आहेत. यातील बोरिवली गावातील एक तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे बुधवारी 13 मे रोजी प्राप्त अहवालातून स्पष्ट झाले होते. होम क्वारंटाईन असलेल्या या रुग्णाला दापोलीत आणण्यासाठी दापोली येथून मध्यरात्री रुग्णवाहिका व प्रशासनाचे एक पथक त्याच्या गावी दाखल झाले. बोरिवली ग्रामस्थांनी त्याची राहण्याची व्यवस्था गावातील शाळेच्या एका खोलीत केली होती. त्याला आणण्यासाठी गेलेल्या पथकाने या तरुणाला त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगून त्याने रुग्णवाहिकेतून त्यांच्याबरोबर यावे अशी विनंतीदेखील केली. मात्र हे ऐकून घाबरलेल्या या तरुणाने लघुशंकेच्या बहाण्याने शाळेच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने पळ काढला.
पळालेला युवक कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्याला धावत जाऊन कसे पकडावे, असा प्रश्न उपस्थित सर्वांना पडला. त्यातच रात्रीचा अंधशर व अनोळखी परिसर यामुळे ही घटना दाभोळ पोलिसांना कळवण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, दाभोळ दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक दीपक कदम तातडीने गावात दाखल झाले. त्यांच्यासह पोलीस मित्र व ग्राम सुरक्षा दलाने रातोरात त्या युवकाला जंगलात शोधण्याची मोहीम हाती घेतली. मात्र रात्रीच्या अंधारात तो कुठेही सापडला नाही.
सकाळी उजाडताच पुन्हा ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली. जंगलाला चारही बाजूंनी ग्रामस्थांनी वेढा देत शोध सुरु केला. यावेळी हा युवक जंगलात लपून बसलेला आढळला. पोलीस व ग्रामस्थांनी या युवकाचे लांबूनच प्रबोधन केले. पोलीस आले असले तरी ते अटक करण्यासाठी नव्हे तर त्याला बरे करण्यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत, ही बाब त्याला ससमजावून सांगण्यात आली. दीर्घकाळ त्याची समजून काढल्यानंतर तो पोलिसांना शरण आला व रुग्णवाहिकेतून दापोलीकडे रवाना झाला. दापोलीत या युवकाला विलगीकरण कक्षात वैद्यकीय निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.