प्रतिनिधी/ चिपळूण
मुंबईहून आलेला खांदाटपाली येथील तरूण कोरोना पॉझिटीव्ह मिळाल्याने येथे खळबळ उडाली आहे. अशातच त्याच्या बहिणीसह क्वॉरंटाईन असलेल्या 28जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे हा काही अंशी दिलासा आहे. त्याच्या आईच्या अहवालाची अजून प्रतीक्षा असून कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील डॉक्टर, नर्ससह 32जणांना होमक्वॉरंटाईन करण्यात आले आहे. सील केलेल्या गावांमध्ये 40 आरोग्य पथके तैनात करण्यात आली असून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ग्रामस्थांना आवश्यक सुविधा घरपोच दिल्या जाणार असून प्रशासकीय यंत्रणेची येथे करडी नजर आहे.
काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे मुंबईहून आलेला आणि पेढांबे येथील मंदार कॉलेजमध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्षात असलेला तरूण 2 दिवसांपूर्वी कोरोनो पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे येथे खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पावणेसातशे लोकवस्तीच्या पाली गावाच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. पालीसह खांदाट, नवीन कोळकेवाडी, दळवटणे ब्रीज, कळंबस्ते, वालोपे, खेड तालुक्यातील आंबडस, काडवली-हुमणेवाडी, काजवेवाडी, केळणे-गोमलेवाडी ही गावे कंटेन्मेंट झोन, निरबाडे, पेढे, खेर्डी, चिपळूण शहर, उपनगर, धामणवणे तर खेड तालुक्यातील चिरणी, भेलसई, केळणे, काडवली ही गावे बफरझोनमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.
कोरोनाचे संकट घेंघावत असतानाच गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई, पुणे येथून अनेकजण आरोग्याचे कारण दाखवत पास, तर काहीजण चोरटय़ा मार्गाने येथे येत आहेत. अशा व्यक्तींना पेढांबे येथे क्वॉरंटाईन करण्यात आले होते. या सर्वांचे नमुने तपासणीसाठी मिरज येथे पठवण्यात आले होते. यातूनच संबंधित तरूण पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र आता सुदैवाची बाब म्हणजे त्याच्या बहिणीसह 28जणांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे क्वॉरंटाईन असलेल्या 61जणांना पेढांबे येथून घरी पाठवले जाणार आहे. मात्र कोरोनाग्रस्ताच्या आईचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याने तिच्यासह त्याची बहीण कामथे येथे आयसोलेटमध्ये आहेत.
डॉक्टर, नर्ससह 32 जण होमक्वॉरंटाईन
कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या डॉक्टर, नर्ससह 32जणांना होमक्वॉरंटाईन करण्यात आले आहे. सील केलेल्या गावांमध्ये चिपळुणातील 29, तर खेडमधील 11 अशी 40 आरोग्यपथके तैनात करण्यात आली आहेत. यात आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका आदींचा समावेश आहे. यातील प्रत्येक पथकाकडे 50 घरांची जबाबदारी देण्यात आली असून त्यातील 14 दिवस या घरांमध्ये जाऊन सर्वेक्षण करायचे आहेत. त्यातून आजारी असणाऱया व्यक्तींवर योग्य ते उपचार केले जाणार आहेत. तसेच पाली ग्रामपंचायतीमध्ये दवाखाना सुरू करण्यात आला असून येथे डॉ. हर्षदा भिसे या तपासणी करीत आहेत.
ग्रामस्थांना मिळणार घरपोच सेवा
सील केलेल्या गावातील ग्रामस्थांना आवश्यक त्या सर्व सेवा, जीवनावश्यक वस्तू यांचा पुरवठा घरपोच केला जाणार आहे. यासाठी त्यांना ग्रामपंचायतीमध्ये हव्या असलेल्या वस्तूंची नोंदणी करावी लागणार आहे. या वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी येथे पथके तैनात करण्यात आली असून त्यात मंडल अधिकारी, तलाठी आदींचा समावेश आहे.
जिल्हा आरोग्य अधिकाऱयांची भेट
कोरोना पॉझिटीव्ह सापडल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी बबिता कमलापूरकर यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्यासह भेट देऊन पाहणी केली. तसेच विविध प्रकारची माहिती देत सर्वेक्षण कसे करावे, या बाबत पथकांना मार्गदर्शन केले.
प्रशासनाची करडी नजर
खांदाटपाली येथे कोरोनाग्रस्त सापडताच प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. पोलिसांनी पाली गावच्या सीमा बंद केल्या असून निरबाडे मोहल्ला, पाली फाटा अशा 2 ठिकाणी बॅरिकेट उभारून नाकाबंदी करण्यात आली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी गावास भेट देत उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्याकडून माहिती घेतली. तसेच त्यांना बंदोबस्ताबाबत मार्गदर्शन केले. येथे मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. प्रातांधिकारी प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जयराज सूर्यवंशी, गटविकास अधिकारी सरिता पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव या सर्व गावांवर लक्ष ठेऊन आहेत. गावातील परिस्थिती योग्य राखण्यासाठी सरपंच अजित महाडिक यांच्यासह अनेकजण प्रशासनाला सहकार्य करीत आहेत.