नवी दिल्ली / वृत्तसंस्था
क्रीडा मंत्रालयाने दुहेरी आशियाई सुवर्णजेती महिला कबड्डीपटू व्ही. तेजस्विनी हिला दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तेजस्विनी सध्या कोरोनाविरुद्ध झुंजत असून तिच्या पतीचे देखील कोरोनामुळेच निधन झाले आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने या प्रतिकूल कालावधीत माजी ऍथलिट व प्रशिक्षकांना सहाय्य करण्यासाठी विविध राष्ट्रीय फेडरेशन्सच्या माध्यमातून पुढाकार घेत यासाठी त्यांनी पंडित दिनदयाल उपाध्याय नॅशनल वेल्फेयर फंड स्थापित केला आहे. त्यातून तेजस्विनीला सदर मदत केली गेली आहे.
तेजस्विनी व तिचे पती नवीन या दोघांनाही दि. 1 मे रोजी कोरोनाची बाधा झाली असल्याचे निदर्शनास आले. सध्या तेजस्विनी कोरोनातून सावरत आहे. तिच्या पतींचे मात्र दि. 11 रोजी निधन झाले आहे.
‘नवीन हे अवघ्या 30 वर्षांचे होते आणि वडिलांच्या निधनामुळे त्यांना धक्का बसला होता. एकप्रकारे त्यांच्या मनात कोरोनाविषयी भीती व तणावही निर्माण झाला होता’, असे तेजस्विनीने भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या माध्यमातून म्हटले आहे. ‘मला ही आर्थिक मदत अपेक्षित नव्हती. पण, क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय ऑलिम्पिक संघटना यांनी यासाठी पुढाकार घेतला. प्रत्येकाला आर्थिक अडचण असू शकते. अशा कठीण प्रसंगात कोणी मदतीचा हात पुढे केला तर त्याचे महत्त्व वेगळे असते’, असे तेजस्विनी याप्रसंगी पुढे म्हणाली. माझे एक अपत्य अवघ्या 5 महिन्यांचे असून आता मला त्यासाठी आर्थिक नियोजन करावे लागेल, याचा तिने येथे उल्लेख केला.
कर्नाटकाच्या तेजस्विनीने 2011 मध्ये अर्जुन पुरस्कार जिंकला असून 2010 व 2014 आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱया भारतीय महिला कबड्डी संघात तिचा समावेश होता.