बेंगळूरमधील हृदयद्रावक घटना : इस्पितळाने प्रवेश नाकारला
प्रतिनिधी / बेंगळूर
बेंगळूरमध्ये कोरोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात झाला असून रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेडची कमतरता भासू लागली आहे. 58 वर्षीय कोरोनाबाधित महिलेला इस्पितळात बेड न मिळाल्याने इस्पितळाबाहेरील बाकावर विव्हळत पडण्याची वेळ आली. ही घटना सोमवारी घडली असून हे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
काही दिवसांपूर्वी 58 वर्षीय महिलेची कोविड चाचणी करण्यात आली होती. तिच्या चाचणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. मात्र, सोमवारी तिला डायलिसिससाठी बेंगळूरच्या मल्ल्या इस्पितळात जावे लागले. मात्र, तिला आतमध्ये प्रवेश देण्यात आला नसल्याचा आरोप होत आहे. याविषयी विचारणा केली असता तेथील कर्मचाऱयांनी हे इस्पितळ कोविड रुग्णांसाठी राखीव नसल्याचे सांगितले. त्यामुळे कोरोनाबाधित महिलेला इस्पितळाबाहेरील बाकावर पडून राहण्याची वेळ आली.
सदर महिला आठवडय़ातून दोनवेळा या इस्पितळात डायलिसिससाठी येत होती. मागील वेळी तिची कोविड चाचणी करण्यात आली. सोमवारी पुन्हा डायलिसिससाठी आल्यानंतर तिला तुमचा चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे सांगून आतमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. सदर महिलेला ताप आल्याने ती अत्यवस्थ होऊन बाकावरच विव्हळत पडून होती. तिच्याकडे कोणत्याही आरोग्य कर्मचारी अथवा साहाय्यकाने लक्ष दिले नाही.