जुने बेळगावच्या नागरिकाचे प्रशासनाला आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याची नोंद आरोग्य विभागाकडे होते. त्यामध्ये नाव, त्यांचा पत्ता तसेच फोन क्रमांकदेखील असतो. आरोग्य विभाग याबाबत संपूर्ण यादी तयार करते. त्या यादीबाबत गुप्तता बाळगणे गरजेचे आहे. मात्र, ही यादी सोशल मीडियावर अपलोड होत आहे. ही बाब गंभीर आहे. कारण त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा ती यादी गुप्त ठेवावी, अशी मागणी जुने बेळगाव येथील भरत कुरबर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
कोरोनाची लागण झाल्यानंतर मदत करण्याऐवजी काहीजण कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबीयांनाच नाहक त्रास देत आहेत. कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना टोमणे मारणे, नको ते बोलणे, असे प्रकार घडत आहेत. कोरोना झाला म्हणजे तो मोठा आजार नाही. बरेच जण होम क्वारंटाईन होऊन उपचार घेत असतात. ते पूर्णपणे बरे होत आहेत. असे असताना मदत करण्याऐवजी काहीजण त्यांच्यावर बहिष्कार घालण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना डिवचण्यातच धन्यता मानत आहेत. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. तेव्हा नावांची यादी गुप्त ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कुटुंबीयांना नाहक त्रास
कोरोनाग्रस्त रुग्णांना अनेक सामाजिक कार्यकर्ते रात्रंदिवस मदत करत आहेत. कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कारही करत आहेत. मात्र, काही अतिशहाणे कोरोनाग्रस्तांना व त्यांच्या कुटुंबीयांना नाहक त्रास देण्याचे प्रकार काही ठिकाणी घडत आहेत, हे चुकीचे आहे. मात्र, त्या अतिशहाण्यांना सांगणार कोण? त्यापेक्षा कोरोनाग्रस्तांची नावेच गुप्त ठेवावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.