कोरोना या जगभरात धुमाकूळ घालणाऱया विषाणूचा जनक कोण, निसर्ग की मानव हा यक्षप्रश्न सर्वांना पडला आहे. विविध देश आणि त्यांच्या गुप्तचर संस्था याचा शोध घेण्यात गढल्या असून सध्या संशयाची सुई चीनवरच स्थिरावते आहे. उद्रेकाच्या प्रारंभीच्या काळात चीनलाच यासाठी जबाबदार धरण्यात आले होते. त्यामुळे जगभरात चीनविरोधात संतापाची लाट उसळली होती. चीनचे हे जगावर लादलेले जैविक युद्ध आहे, येथपासून ते चीनच्या वुहान शहरातील प्रयोगशाळांमध्ये कृत्रिम विषाणूंची निर्मिती होत असून तेथूनच कोरोना जगभर पसरला किंवा तो मुद्दाम पसरविण्यात आला, असे अनेक आरोप झाले. तथापि, नंतर या आरोपांची तीव्रता कमी झाली. हा विषाणू नैसर्गिक असून चीनमध्येच त्याचा प्रादुर्भाव झाला पण चीनच्या निष्काळजीपणामुळे त्याची माहिती जगाला आधी समजली नाही, अशा प्रकारचे सौम्य आरोप होऊ लागले. याचाच अर्थ असा की कटकारस्थानाचा आरोप मागे पडून ‘अपघाता’चा आरोप होऊ लागला. आणखी थोडय़ा कालानंतर ही चर्चाही मागे पडून जग कोरोनाशी संघर्ष करण्यात मग्न झाले. मात्र गेल्या आठवडय़ापासून ही चर्चा पुन्हा सुरू झाली असून या उत्पाताला चीनच जबाबदार आहे, असा निष्कर्ष काढण्याइतकी सामग्री असल्याचा दावा केला जाऊ लागला आहे. फ्रान्सचे विषाणूतज्ञ आणि 2008 चे नोबेल पारितोषिक विजेते ल्युक माँटेनियर यांच्या स्फोटक विधानामुळे चीनवरचा संशय अधिक पक्का झाला. त्यांच्या संशोधनानुसार कोरोनाचा विषाणू निसर्ग निर्मित नसून मानवनिर्मित आहे. या विषाणूच्या जनुकीय रचनेचा सखोल अभ्यास करता, तो नैसर्गिक नसल्याचे स्पष्ट होते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी हे विधान फ्रान्सच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेत एचआयव्ही किंवा एड्स या जीवघेण्या रोगावर लस निर्मितीचा प्रयोग चालला असताना कोरोना या विषाणूची निर्मिती झाली. या विषाणूच्या जनुकांमध्ये एचआयव्ही आणि मलेरिया यांच्या विषाणूंचे घटक आढळले आहेत. असे घटक नैसर्गिकरित्या कोरोनाच्या विषाणूमध्ये मिसळले जाणे अशक्य आहे. त्यामुळे या विषाणूची निर्मिती कृत्रिमरित्या झाली असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. नंतर हा नवा विषाणू या प्रयोगशाळेतून ‘निसटला’ आणि जगात सर्वत्र बाधित माणसांच्या माध्यमातून प्रसारित झाला. या घटनेला पुष्टी देणारा दुसरा प्रसंग म्हणजे, या विषाणूने बाधित असणारा जगातील पहिला रुग्ण सापडण्याअगोदर वुहान येथील याच प्रयोगशाळेतील अनेक संशोधक आजारी पडले होते. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळली होती आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही करण्यात आले होते, असा गौप्यस्फोट आता झाला आहे. याचाच अर्थ असा की, अधिकृतरित्या जगात या विषाणूचा पहिला रुग्ण सापडण्याअगोदर वुहानमध्ये त्याची लागण झाली होती आणि चीनला हा विषाणू बाहेर पडला आहे, याची पूर्ण कल्पनाही आली होती. त्याचवेळी ही माहिती जगाला दिली गेली असती तर कदाचित आजचा अनर्थ टाळला जाऊ शकला असता. कारण जग सावध झाले असते आणि सर्व देशांनी या इशाऱयाचे गांभीर्य समजून घेऊन त्यादृष्टीने तेव्हापासूनच सज्जता ठेवली असती. तथापि, आपल्यावर ठपका येऊ नये म्हणून चीनचे ही माहिती लपविली, असा आरोप केला जात आहे. तर बऱयाच तज्ञांच्या आरोपानुसार ही माहिती चीनने हेतुपुरस्सर लपविली आहे. तथापि, अन्य काही तज्ञ असे आहेत की ज्यांनी माँटेनियर यांचा दावा फेटाळला आहे. फ्रान्सचेच विषाणू तज्ञ एटीनी सिमॉनलिअर यांनी माँटेनियर यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचे म्हटले होते. जागतिक आरोग्य संघटनेनेही सार्स कोव्हीड 2 (कोरोनाचा मूळ विषाणू) हा मानवनिर्मित नसल्याचे स्पष्ट केले होते. एकंदर, या संदर्भात परस्पर विरोधी प्रतिपादने केली जात असल्याचे दिसते. तरीही बहुतेक तज्ञांच्या म्हणण्यानुसार एक बाब निश्चितपणे समोर येते. ती अशी की या विषाणूचा जन्म चीनमधील वुहान येथील प्रयोगशाळेत झाला आणि चीनला त्याच्या तीव्रतेची माहिती व अनुभव असतानाही त्याने ती माहिती जगापासून लपविली. विषाणूची निर्मिती मानवनिर्मित असो किंवा नसो, त्याचा प्रसार चीनच्या निष्काळजीपणातून झाला, यावर अनेकांचे एकमत असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेनेही आता या प्रकरणात अधिक गंभीरपणे लक्ष घातले असून आपल्या गुप्तचर संस्थांना कामाला लावले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडन यांनी गुप्तचर संस्थांना कोरोनाच्या जनकत्वासंबंधातील अहवाल 90 दिवसात सादर करा, असा आदेश दिला आहे. चीनमध्ये या विषाणूचा प्रथम प्रादुर्भाव विशिष्ट प्राण्यांच्या संपर्कात मानव आल्याने झाला की प्रयोगशाळेतील अपघातामुळे झाला, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी लवकरात लवकर गुप्तचर संस्थांकडून मागितले आहे. चीनवर संशय घेण्यासाठी अनुकूल अशी आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे सुरुवातीच्या काळात जागतिक तपासणी अधिकाऱयांना चीनने वुहान येथील प्रयोगशाळांमध्ये प्रवेश दिला नव्हता. पण आता, चीनला या तपासणी कार्यात पूर्ण सहकार्य करावे लागेल, असे बायडन यांनी बजावले आहे. कोरोनाचे मूळ शोधले गेल्यास पुढील उद्रेकांना यशस्वीरित्या तोंड देणे शक्य होईल, असेही व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यात कोरोनाचे मूळ कोठे आहे आणि त्याचा जनक कोण यावर काही ना काही प्रकाश टाकला जाण्याची शक्यता आहे. या संबंधी खरे संशोधन होणे अत्यावश्यक आहे. यात ढिलाई दाखविल्यास ज्याप्रमाणे काही दशकांपूर्वी अण्वस्त्र निर्मितीची स्पर्धा सुरू झाली तशी स्थिती या जैवप्रयोगांच्या संदर्भातही होण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास इतर देशांमध्येही अशा विषाणूंची निर्मिती होऊ शकते आणि नंतर ते अपघाताने निसटले अशी सारवासारवी केली जाऊ शकते. त्यामुळे जगासमोरचा धोका वाढू शकतो. त्यामुळे विश्वसमुदायाने एकत्र होऊन असे प्रकार वेळीच रोखणे आणि कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
Previous Articleलाल किल्ला हिंसाप्रकरणी मोठा खुलासा
Next Article पाची बोटे सारखी नसतात
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.