वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरही प्रभाव पडत आहे. यातील व्यापार उद्योगांसोबत सध्या जगाची सफर करुन देणारे विमान क्षेत्रालाही या कोरोनाचा फाटका बसणार असल्याचे संकेत व्यक्त होत आहेत. जगभरातील विमान कंपन्यांना जवळपास 113 अब्ज डॉलरपर्यंत प्रवासी महसूलात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशी माहिती इंटरनॅशनल एअर ट्रान्स्पोर्ट असोसिएशन यांच्या अनुमानातून सांगण्यात आले आहे. हा फटका 2008 च्या आर्थिक नुकसानीच्या बरोबरीचे होण्याचा अंदाजही नोंदवला आहे.
सदर कोरोनाचा विळखा वाढतच राहिला तर एकूण प्रवासी महसूलात 63 अब्ज डॉलरने नुकसान होऊ शकेल असे सुत्रांच्या माहितीनुसार सांगण्यात आले आहे. आयएटीए यांनी 20 फेब्रुवारीला कोरोना विषाणूच्या धास्तीने 29.3 अब्ज डॉलरच्या महसूलाचे नुकसान झाल्याचे अनुमान मांडले आहे. हा आकडा चीनमधील कोरोना विषाणूशी संबंधीत असल्याचे नमूद केले आहे.
आयएटीएने सादर केलेल्या एका माहितीनंतर सध्याच्या कालावधीतपर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग 80 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. आणि चीनसोडून दुसऱया विमान मार्गांवरही बुकिंगवर नकारात्मक परिणाम होत असल्याचे अनुमान आहे. आर्थिक बाजारात विमान कंपन्यांची समभाग किमती 25 टक्क्यांपर्यंत घसरल्या आहेत. असे वातावरण 2003 मध्ये आलेल्या सार्सच्या प्रसंगी झाले होते. त्याच्या तुलनेत सध्या 21 टक्क्यांहून अधिक समभाग किमती घसरल्या असल्याचेही स्पष्ट केले आहे.